नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये भरलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महाकुंभ मेळाव्यासाठी दररोज लाखो लोक प्रयागराजला जात आहे. अनेक जण प्रयागराजला जाणयासाठी विमानाने जात आहे. त्यामुळे विमान प्रवास महागला आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाने (आप) महाकुंभ दरम्यानच्या विमान भाड्यांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
विमान कंपन्यांनी महाकुंभाला फायदेशीर करार बनवले आहे. सेवा देण्याऐवजी कंपन्या लूट करण्यात व्यस्त आहेत. सरकारने हे त्वरित थांबवले पाहिजे, असे आपचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडिओ जारी करत म्हटले आहे की, प्रयागराजला जाण्यासाठी विमानाचे भाडे ५ हजार रुपये होते, ते आता कंपन्या ६०-७० हजार रुपये भाडे आकारत आहेत. ही उघड लूट आहे. वाढलेल्या भाड्यामुळे लोक प्रयागराज कुंभमेळ्याला जाऊ शकत नाहीत.
५ हजार रुपयांचे तिकीट ५० हजार रुपये झाले आहे, हा कसला नियम आहे? असा सवाल करत हे श्रद्धेशी छेडछाड असल्याचे राघव चड्ढा यांनी म्हटले आहे. तसेच, राघव चड्ढा यांनी केंद्र सरकारला याकडे लक्ष देण्याचे, यासंबंधी आढावा घेण्याचे आणि त्यावर त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले. लोकांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांच्यावर भाड्याचा भार पडू नये म्हणून सरकारने भाडे निश्चित करावे, असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, सरकारकडे विमान कंपन्यांच्या भाड्यांबाबत मार्गदर्शक तत्त्वे बनवण्याची मागणीही राघव चड्ढा यांनी केली आहे.
पवित्र स्नानाच्या दिवशी विमानाचे तिकीट दर गगनाला भिडलेप्रयागराज महाकुंभासाठी सुरू असलेल्या विमानांच्या भाड्याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अलिकडेच दिल्ली ते प्रयागराज विमान प्रवासाचे भाडे सुमारे ४० हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. सामान्य दिवसांमध्ये हे भाडे सुमारे ३ हजार रुपये होते. दरम्यान, महाकुंभमेळ्यात पवित्र स्नानाच्या दिवशी विमानांची तिकिट सर्वाधिक दराने विकली जात आहे. महाकुंभमेळ्यात २९ जानेवारी, ३ फेब्रुवारी, १२ फेब्रुवारी यासारख्या दिवशी दिल्ली, मुंबईहून प्रयागराजला जाणाऱ्या विमानाचे तिकीट दर गगनाला भिडले आहेत.