हरिश गुप्तानवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर व ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. रघुराम राजन यांना आम आदमी पक्षातर्फे (आप) राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात बुधवारी आश्चर्य व्यक्त केले गेले. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ गोपाल सुब्रमण्यम यांनाही आपने उमेदवारीची आॅफर दिली आहे. याखेरीज काँग्रेसशी जवळीक असलेल्या एका प्रमुख उद्योगपतीचे नावही चर्चेमध्ये आहे.आपतर्फे दिल्लीतून तीन जण राज्यसभेवर जाऊ शकतात. विधानसभेत काँग्रेस व भाजपाची काहीच ताकद नाही. त्यामुळे आपने ही नावे निश्चित केल्याचे समजते. आपच्या नेत्यांपैकी आशुतोष, संजय सिंग, कुमार विश्वास यांना राज्यसभेवर न पाठवण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला असल्याचे सांगण्यात येते.‘आप’ने केलेल्या उमेदवारीच्या प्रस्तावावर डॉ. राजन विचार करत असल्याचेही या वृत्तात नमूद केले गेले. मात्र रघुराम राजन व गोपाल सुब्रमण्यम यांच्यापैकी कोणाहीकडून यास दुजोरा मिळाला नाही. गोपाल सुब्रमण्यम व राजन या दोघांना मोदी यांनी दुखावले आहे. त्यामुळे ते मोदीविरोधी गटातील म्हणून ओळखले जातात.दिल्ली विधानसभेतून राज्यसभेवर निवडून गेलेल्या तीन सदस्यांची मुदत येत्या जानेवारीत संपत आहे. या तीन जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधानसभेत ७0पैकी ६५ सदस्य ‘आप’चे असल्याने या तिन्ही जागा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पक्ष हमखास जिंकू शकतो. तीन वर्षे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राहिल्यानंतर डॉ. राजन यांनी त्याच पदावर फेरनियुक्तीची इच्छा व्यक्त केली होती. परंतु मोदी सरकारने त्यांना मुदतवाढ दिली नाही. त्यानंतर आता राजन शिकागो विद्यापीठाच्या बूथ स्कूल आॉफ बिझिनेसमध्ये प्राध्यापक म्हणून पुन्हा रुजू झाले आहेत.विरोधी पक्षांच्या आघाडीमध्ये केजरीवाल यांच्या पक्षाला स्थान असावे, यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रयत्नशील आहेत, तर काँग्रेसचा दिल्लीतील राजकारणामुळे केजरीवाल यांना विरोध आहे. काँग्रेसचा विरोध शांत करून, भाजपाविरोधी आघाडीत स्थान मिळावे, यासाठी केजरीवाल यांनी काँग्रेसशी जवळीक असलेल्यांना उमेदवारी देण्याचे ठरविले असावे, असे बोलले जाते.स्वत: केजरीवाल हेही राष्ट्रीय राजकारणात प्रवेशाचा भाग म्हणून राज्यसभेवर जातील, अशी चर्चा आपमध्ये जोरात सुरू आहे. तसा निर्णय त्यांनी घेतला, तर दिल्लीची सूत्रे मनीष सिसोदिया यांच्याकडे ते सोपवतील. म्हणजेच सिसोदिया मुख्यमंत्री होऊ शकतील.
रघुराम राजन, गोपाल सुब्रमण्यम राज्यसभेवर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 2:57 AM