नवी दिल्ली- भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जर मला एखादी चांगली संधी मिळाली, तर भारतात परतण्यास तयार असल्याचं रघुराम राजन म्हणाले आहेत. जर विरोधकांचं सरकार सत्तेवर आल्यास पुढचे आरबीआय गव्हर्नर हे रघुराम राजन होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषाचे माजी अर्थशास्त्रज्ञ रघुराम राजन म्हणाले, मी जिथे आहे, तिथे आनंदी आहे. पण नव्या संधीसाठी मी तयार आहे. रघुराम राजन यांनी भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए सरकारमध्ये रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा कार्यकाळ पूर्ण केलेला नव्हता. ते त्यांच्या पुस्तक प्रकाशनावेळी बोलत होते. मी जिथे आहे, तिथे फार खूश आहे. पण माझ्या योग्य एखादी संधी मिळाल्यास मी पुन्हा भारतात येईन. सध्या रघुराम राजन हे शिकागो युनिव्हर्सिटीतल्या बूथ स्कूल ऑफ बिजनेसमध्ये मुलांना व्यावसायिकतेचे धडे देत आहेत. जर तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपासारखे महागठबंधनमधले विरोधी पक्ष सत्तेवर आल्यास रघुराम राजन यांना अर्थमंत्री बनण्याची संधीही मिळू शकते, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.किमान उत्पन्न योजनेसाठी आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासह अनेक अर्थतज्ज्ञांशी चर्चा केल्याची माहिती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दिली होती. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबांना दर वर्षी 72 हजारांची मदत देण्याची घोषणा राहुल गांधींनी सोमवारी (25 मार्च) केली होती. मात्र या योजनेची अंमलबजावणी अवघड असल्याचं मत काही अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 'किमान उत्पन्न योजनेवर आम्ही गेल्या 6 महिन्यांपासून काम करत होतो.जगातील अनेक प्रख्यात अर्थतज्ज्ञांशी आम्ही यासाठी चर्चा केली. यामध्ये आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचाही समावेश आहे,' असं राहुल गांधी म्हणाले. यासाठी एकूण 3.60 लाख कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. ही रक्कम देशाच्या एकूण जीडीपीच्या 1.7 टक्के असल्याचं राहुल यांनी सांगितलं. मात्र या योजनेची अंमलबजावणी कशी केली जाणार, याची माहिती अद्याप काँग्रेसकडून देण्यात आलेली नाही.
मी भारतात परतण्यास तयार, योग्य संधीची वाट पाहतोय- रघुराम राजन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 1:15 PM