मुंबई - भारतीय रिजर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी नुकतीच भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु, आपण चांगल्या संधीच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशात सध्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत सत्तांतर झाल्यास सत्तेवर येणाऱ्या पक्षाकडून राजन यांना संधी मिळू शकते. किंबहुना राजन यांचा भारतात परतण्याचा निर्णय काँग्रेसच्या पथ्यावरच पडेल.
एनडीए सरकारमध्ये रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा कार्यकाळ रघुराम राजन यांना पूर्ण करता आलेला नाही. परंतु, मी जिथे आहे, तिथे आनंदीत असल्याचे सांगताना भारतात परतण्यासाठी त्यांनी योग्य संधीचा उल्लेख केला आहे. त्याचे हे वक्तव्य नेमके लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीच्या वेळी आले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून राजन युपीए सरकार सत्तेत आल्यास देशाचे पुढील अर्थमंत्री राहतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
१९९१ मध्ये भारताची अर्थव्यवस्था अडचणीत आली होती. त्यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे अर्थ खाते सोपविण्यात आले होते. त्यावेळी मनमोहन सिंग यांनी भारताला अर्थिक संकटातून बाहेर काढले होते. आता देखील देश आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. त्यासाठी उत्तम अर्थतज्ज्ञांची भारताला गरज आहे. तर राजन यांना युपीए सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून प्रोजेक्ट केल्यास ते काँग्रेसच्या पथ्यावरच पडले, अशी शक्यता आहे.
सध्या राजन हे शिकागो युनिव्हर्सिटीतल्या बूथ स्कूल ऑफ बिजनेसमध्ये मुलांना व्यावसायिकतेचे धडे देत आहेत. इतिहास पाहिल्यास तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपासारखे महागठबंधनमधले विरोधी पक्ष सत्तेवर आल्यास रघुराम राजन यांना अर्थमंत्री बनण्याची संधीही मिळू शकते. परंतु, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच राजन यांच्या संभाव्य संधीचा उलगडा होणार आहे.