नवी दिल्ली: बुडीत खात्यात गेलेल्या कर्जावरुन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिलेल्या निवेदनावरुन काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कर्जबुडव्यांची यादी पंतप्रधान कार्यालयाला दिली होती. मात्र त्यावर काय कारवाई झाली, याबद्दलची माहिती माझ्याकडे नाही, असं राजन यांनी म्हटलं आहे. बँकांच्या बुडीत खात्यात गेलेल्या कर्जांबद्दल लोकसभेच्या समिक्षा समितीनं राजन यांना त्यांची बाजू मांडण्यास सांगितलं होतं. देशातील अनेक बँकांची कर्जे बुडीत खात्यात गेली आहेत. त्यामुळे बँका संकटात सापडल्या आहेत. याबद्दल रघुराम राजन यांनी सविस्तर निवेदन दिलं. 'हाय प्रोफाईल' कर्जबुडव्यांची यादी पीएमओला दिली होती. मात्र त्या यादीचं पुढे काय झालं, सरकारनं काय कारवाई केली, याची माहिती माझ्याकडे नाही, असं राजन म्हणाले. मात्र राजन यांनी पीएमओबद्दल अधिक भाष्य केलेलं नाही. त्यामुळे ते मोदी यांच्या पीएमओबद्दल बोलत आहेत की मनमोहन सिंग यांच्या पीएमओबद्दल याबद्दल स्पष्टता नाही. मात्र यावरुन भाजपा आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे. रघुराम राजन यांनी बुडीत खात्यातील कर्जांबद्दल यूपीए सरकारला थेट जबाबदार धरलेलं नाही. मात्र त्यांनी मोदी सरकारलाही क्लिन चीट दिलेली नाही. मोदी सरकारच्या अनेक योजनांमुळे बुडीत खात्यात गेलेलं कर्ज वाढलं, अशा स्पष्ट शब्दांमध्ये राजन यांनी त्यांच्या बाजू मांडली. यानंतर काँग्रेस आणि भाजपानं एकमेकांवर आरोप करण्यास सुरुवात केली. राजन यांच्या निवेदनानंतर काँग्रेसनं वर्तमानपत्रांची कात्रणं दाखवून भाजपावर शरसंधान साधलं आहे. तर काँग्रेसमुळेच बँका गाळ्यात गेल्या, असे आरोप भाजपानं सुरू केले आहेत.
'हाय प्रोफाईल' कर्जबुडव्यांची यादी पीएमओला दिली होती- राजन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 11:39 AM