राहुल अमेठीत; भाजपला लक्ष्य करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 04:45 AM2018-09-25T04:45:30+5:302018-09-25T04:45:46+5:30
कैलास मानसरोवराची यात्रा पूर्ण करून आलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना ‘शिवभक्त’ म्हणून गौरविल्यानंतर ते सोमवारी आपल्या अमेठी लोकसभा मतदारसंघात गेले
अमेठी - कैलास मानसरोवराची यात्रा पूर्ण करून आलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना ‘शिवभक्त’ म्हणून गौरविल्यानंतर ते सोमवारी आपल्या अमेठी लोकसभा मतदारसंघात गेले असता ‘बम बम भोले’च्या घोषात कनवारिया संघाने त्यांचे स्वागत केले. या मतदारसंघाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर ‘शिवभक्त राहुल गांधी’ असे मोठमोठाले फलक लावण्यात आले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांत हिंदू मतदारांना आकृष्ट करण्यासाठी काँग्रेसने ही नवी रणनीती तयार केल्याचे सांगण्यात आले.
अमेठी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष योगेश मिश्रा यांनी सांगितले की, मानसरोवर यात्रा हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानण्यात आली आहे. या यात्रेहून परतल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच अमेठीच्या दौºयावर आले असून, त्यामुळे त्यांचे जंगी स्वागत करण्याचा आमचा मनसुबा होता आणि ते आम्ही करून दाखवले.
मंगळवारी प्रभातफेरीमध्ये राहुल गांधी सहभागी होतील. काँग्रेस कार्यकर्ते २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीपर्यंत या मतदारसंघातील गावागावांमध्ये प्रभातफेरी काढतील. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात एप्रिलमध्ये राहुल गांधी प्रवास करीत असलेले विमान अचानक हवेत हेलकावे खात शेकडो फूट खाली आले होते. या संकटातून बचावल्यानंतर त्यांनी कैलास मानसरोवर यात्रेला जाण्याचा संकल्प सोडला होता.
इराणींना देणार प्रत्युत्तर?
या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठीचा दौरा केला होता. या मतदारसंघाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केली होती. त्याला राहुल नेमके काय उत्तर देतात, याकडेही लक्ष लागले आहे.