शीलेश शर्मा -नवी दिल्ली :पंजाब सरकारच्या सल्लागार पदाचा प्रशांत किशोर यांनी राजीनामा देऊन गांधी कुटुंबाची भेट घेतली तेव्हाच मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून घेतला होता. काँग्रेसच्या नेतृत्वाला सतत असे जाणवत होते की, कॅप्टन अमरिंदरसिंग हे दबावाचे राजकारण करून पक्ष नेतृत्वाला निवडणुकीत माझ्याशिवाय पराभव होईल, अशी भीती दाखवत आहेत. प्रत्येक छोट्या छोट्या मुद्यावर अमरिंदर सिंग राजीनाम्याची धमकी देत होते. जेव्हा प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना सांगितले की, कॅप्टन सिंग यांचा प्रभाव राज्यात घटत असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस निवडणूक जिंकू शकणार नाही. तेव्हा प्रशांत किशोर यांच्या सल्ल्याला दुजोरा मिळण्यासाठी राहुल गांधी यांनी तीन वेगवेगळ्या पाहणी केल्या. या पाहणीत एक बाब समान होती की, पंजाबमधील शेतकरी अमरिंदर सिंग यांच्यावर नाराज असून ती मते अकाली दल किंवा आम आदमी पक्षाला जाऊ शकतात.
परिस्थिती निर्माण केली : अमरिंदर सिंग यांच्या इच्छेविरोधात सिद्धू यांना प्रदेश अध्यक्ष बनवले आणि कॅप्टन यांच्या नेतृत्वाला ते शह देऊ लागले तेव्हा पक्ष श्रेष्ठींनी अशी परिस्थिती निर्माण केली की, अमरिंदर सिंग यांनी स्वत:च राजीनामा द्यावा. कॅप्टन यांनी राजीनाम्याची धमकी देताच सोनिया गांधी यांनी ठीक आहे, असे म्हणत राजीनामा तत्काळ स्वीकारला.