"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 11:22 PM2024-09-16T23:22:16+5:302024-09-16T23:22:56+5:30
"... तर, तुम्हाला ना आईस्क्रीम खाता आले असते ना बाईक चालवता आली असती."
जम्मू-काश्मिरात पुन्हा एकदा दहशतवादाला खतपाणी घालण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, केंद्रशासित प्रदेशात त्याला एवढे खाली गाडले जाईल की, ते पुन्हा कधीच वर येऊ शकणार नाहीत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. याच बरोबर त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नुकत्याच झालेल्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, विरोधी पक्षनेते येथे आइस्क्रीम खात आहेत आणि बाईक चालवत आहेत, कारण एनडीए सरकारने हा प्रदेश सुरक्षित केला आहे.
जम्मू-काश्मिरातील रामबनमध्ये एक प्रचारसभेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले, "आम्ही काश्मीर सुरक्षित केला आहे. म्हणूनच आज राहुल बाबा काश्मीरमध्ये बाईक चालवत आहेत आणि लाल चौकात आईस्क्रीमचा आस्वाद घेत मोदीजींना शिव्या देत आहेत. राहुलबाबा, तुम्ही मोदीजींना शिव्या देत आहात, पण तुमच्या सरकारमध्ये हे शक्य नव्हते. मोदीजींनी दहशतवादाला जमिनीत गाडून टाकले आहे. तुमचे सरकार असते तर, तुम्हाला ना आईस्क्रीम खाता आले असते ना बाईक चालवता आली असती."
अमित शाह गेल्या महिन्यातील जम्मू-काश्मीरमधीलराहुल गांधींच्या एका व्हिडिओवर भाष्य करत होते. ज्यात खासदार राहुल गांधी श्रीनगर मधील लाल चौकात डिनरनंतर, आइसक्रीम पार्लरच्या बाहेर येताना दिसत होते. यापूर्वी, भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ते लडाखमध्ये बाइक चालवताना दिसले होते.