राजीव गांधींच्या योगदानाला राहुल यांनी दिला उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 12:41 AM2019-08-20T00:41:35+5:302019-08-20T00:42:03+5:30
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपले वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील योगदानावर भाष्य केले.
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपले वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील योगदानावर भाष्य केले.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त काँग्रेस या आठवड्यात पूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. राजीव गांधी यांचे योगदान, विविध क्षेत्रांतील त्यांची कामगिरी यावर यानिमित्ताने प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी टष्ट्वीट केले आहे की, या आठवड्यात आम्ही राजीव गांधी यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त पूर्ण देशात स्मृती कार्यक्रमाचे आयोजन करणार आहोत. या आठवड्यात दररोज वडिलांच्या उल्लेखनीय कामगिरीवर लक्ष वेधून घेणार आहे. आज आयटी क्षेत्राबाबत माहिती देत त्यांनी ५५ सेकंदांची एक क्लिप जारी केली आहे.
सूत्रांनी सांगितले की, पक्षाने २२ आॅगस्ट रोजी दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोर स्टेडियममध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात पक्षाचे राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जिल्हा स्तरावरील पदाधिकारी सहभागी होणार आहेत. २० आॅगस्ट रोजी राजीव गांधी यांची जयंती आहे.
काँग्रेसने मंगळवारी दिल्लीस्थित पक्ष मुख्यालयात एक स्मृती कार्यक्रम आयोजित केला आहे. यात पक्षाध्यक्ष सोनिया गांधींसह ज्येष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
इंदिरा गांधींवर वेब सिरीज
मुंबई : ‘द लंच बॉक्स’ आणि ‘फोटोग्राफ’मुळे चर्चेत आलेले रितेश बत्रा आता माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित वेब सिरीजचे दिग्दर्शन करणार आहेत.
अभिनेत्री विद्या बालनची ही पहिली वेब सिरीज आहे. ‘इंदिरा : इंडियाज मोस्ट पॉवरफुल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकावर ही वेब सिरीज आधारित आहे.