राफेल, मणिपूरवरून राहुल यांची टीका; भाजप म्हणाला, ते निराश राजकारणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 05:54 AM2023-07-16T05:54:26+5:302023-07-16T05:54:54+5:30

ते देशाची खिल्ली उडवितात, स्मृती इराणी यांचे प्रत्युत्तर

Rahul criticizes Rafale, Manipur; BJP said, he is a disappointed politician | राफेल, मणिपूरवरून राहुल यांची टीका; भाजप म्हणाला, ते निराश राजकारणी

राफेल, मणिपूरवरून राहुल यांची टीका; भाजप म्हणाला, ते निराश राजकारणी

googlenewsNext

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी राफेल व्यवहारावरून टीका केल्यानंतर भाजपने त्यांच्यावर जोरदार प्रहार करत त्यांना ‘निराश राजकारणी’ संबोधले. त्याचबरोबर त्यांनी देशाच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचा अपमान केल्याचाही आरोप केला. त्यानंतर राहुल यांनी पंतप्रधानांवर केलेल्या टीकेवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.  

‘मणिपूर जळतेय. युरोपियन युनियनने भारताच्या अंतर्गत मुद्यावर चर्चा केली. पण, पंतप्रधानांनी चकार शब्द काढला नाही. दरम्यान, राफेलमुळे त्यांना ‘बॅस्टिल डे परेड’चे तिकीट मिळाले,’ असे ट्वीट गांधी यांनी केले. इराणी यांनी ट्वीटद्वारे त्यांना प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या की, राहुल यांना भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये परकीय हस्तक्षेप हवा आहे. लोकांनी नाकारल्याने मोठे संरक्षण करार त्यांच्या दारापर्यंत पोहोचत नसल्याने ते निराश झाले आहेत. त्यामुळे ते भारताच्या ‘मेक इन इंडिया’ महत्त्वाकांक्षेला धक्का लावण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. आपल्या पंतप्रधानांना राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाल्यानंतर ते देशाची  खिल्ली उडवतात, असे त्या म्हणाल्या. 

भाजपचा आरोप : राहुल गांधी ‘देशांतर्गत राजकीय हिशेब करण्यासाठी अमेरिकेपासून युरोपपर्यंत परदेशी शक्तींवर झुकून भारताच्या हितसंबंधांना हानी पोहोचवणाऱ्या जागतिक गटाशी सहयोग’ करत आहेत, असा आरोप भाजपने केला. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, राफेलचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने फार पूर्वीच निकाली काढला होता व गांधींना ‘संवैधानिक संस्थांवर टीका करणे’ थांबविण्यास सांगितले होते.

Web Title: Rahul criticizes Rafale, Manipur; BJP said, he is a disappointed politician

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.