नवी दिल्ली : न्यायमूर्तींची रिक्त पदे भरण्याबाबत केंद्र सरकारच्या अनास्थेवर सर्वोच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढल्याचा मुद्दा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उचलला आहे. यावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधानांना वास्तव काय आहे, हे दाखविले आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांनी एक टिष्ट्वट करून हा मुद्दा उचलला. ‘सर्वोच्च न्यायालयाने मोदी यांना वास्तव दाखविले. मोदींचे, मोदींकडून, मोदींसाठी चालविण्यात येणारे सरकार काम करीत नाही,’ अशा आशयाचे टिष्ट्वट राहुल गांधी यांनी केले. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नेमणुका आणि बदल्या याबाबत कॉलेजियमने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणीच सरकारने केलेली नाही. हा न्यायव्यवस्था ठप्प करण्याचा प्रयत्न असून, तो सहन केला जाणार नाही. न्यायालय हस्तक्षेप करील, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला होता. भारताचे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील न्यायपीठाने याबाबत सरकारला कडक शब्दांत सुनावले होते. विशेष म्हणजे, न्या. ठाकूर हेच पाच सदस्यीय कॉलेजियमचे प्रमुख आहेत. न्यायपीठाने म्हटले होते की, सरकारच्या अनास्थेमुळे संपूर्ण न्यायव्यवस्थाच कोसळून पडू लागली आहे. कॉलेजियमने केलेल्या न्यायमूर्तींच्या नेमणुकांची अंमलबजावणी न झाल्यामुळे न्यायालयीन कामकाज विस्कळीत झाले आहे. न्यायव्यवस्था ठप्प करण्याचे प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. आम्ही जबाबदारी अधिक मजबूत करू. (लोकमत न्यूज नेटवर्क)सरकार काम करीत नाहीन्यायमूर्तींची रिक्त पदे भरण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वास्तव काय आहे, हे दाखविले. मोदींचे, मोदींकडून, मोदींसाठी चालविण्यात येणारे हे केंद्र सरकार आहे. ते काम करीत नाही, अशा आशयाचे टिष्ट्वट राहुल गांधी यांनी केले.
राहुल यांची मोदींवर कडक टीका
By admin | Published: August 14, 2016 2:03 AM