बंगळुरू - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि टीम इंडियाचा (Team India) मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने आपल्या फलंदाजीच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. सध्याही भारतीय संघाला मार्गदर्शन करत तो आपलं कर्तव्य पार पाडतोय. दरम्यान, आता राहुल द्रविड राजकारणात प्रवेश करणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या सभेला राहुल द्रविड हजेरी लावणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता राहुल द्रविडनेच या वृत्ताबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे, या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
राहुल द्रविड लवकरच एका राजकीय व्यासपीठावर दिसणार असल्याची चर्चा आहे. १२ ते १५ मे या कालावधीत हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथे भाजपायमोची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेतेमंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती धर्मशालाचे भाजपा आमदार विशाल नेहरिया यांनी दिली. तसेच, भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडही यात सहभागी होणार आहे. त्याच्या उपस्थितीमुळे तरुणांमध्ये एक संदेश जाईल की आपण केवळ राजकारणातच नाही, तर इतर क्षेत्रातही नावं मोठं करू शकतो," असेही नेहरिया यांनी स्पष्ट केले. मात्र, आता राहुल द्रविडने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. माध्यमांत येत असलेल्या वृत्ताबाबत मी स्पष्ट करू इच्छितो की, ते वृत्त चुकीचं आहे, असे राहुल द्रविडने सांगितले. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राहुलने बैठकीला आपण उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले.
हिमाचल प्रदेशमधील या तीन दिवसीय अधिवेशनात मुख्यमंत्री जयराम ठाकूरही सहभागी होणार आहेत. अधिवेशनात देशभरातून तब्बल १३९ प्रतिनिधी आपली उपस्थिती नोंदवणार आहेत. "भाजप युवा मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारिणी १२ ते १५ मे दरम्यान धर्मशाला येथे होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व आणि हिमाचल प्रदेशचे नेतृत्व यात सहभागी होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, राष्ट्रीय संघटन मंत्री आणि केंद्रीय मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडही यात सहभागी होणार आहे. त्याच्या उपस्थितीमुळे तरुणांमध्ये एक संदेश जाईल की आपण केवळ राजकारणातच नाही, तर इतर क्षेत्रातही नावं मोठं करू शकतो," असेही नेहरिया यांनी स्पष्ट केले होते. मात्र, आता राहुल द्रविडने हे वृत्त स्पष्टपणे नाकारले आहे.
दरम्यान, हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीआधी भाजपने हा महत्त्वाचा कार्यक्रम ओयाजित केला जात आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात, भाजपने ४४ जागा जिंकल्या होत्या. ३५ हा बहुमताचा आकडा त्यांनी सहज गाठला होता. तर काँग्रेसला २१ जागांवर समाधान मानावे लागले होते.