Rahul Gandhi: 'कोरोना काळात 5 नाही, 40 लाख रुग्णांचा मृत्यू', राहुल गांधींचा सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 02:49 PM2022-04-17T14:49:07+5:302022-04-17T14:49:31+5:30
Rahul Gandhi: 'नरेंद्र मोदी स्वतः खरं बोलत नाहीत आणि इतरांनाही बोलू देत नाहीत.'
नवी दिल्ली: 2020 मध्ये भारतात कोरोनाचे (Corona in India) आगमन झाल्यापासून आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. सरकारी आकडेवारीनुसार, भारतात सूमारे पाच लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पण, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या दाव्यानुसार, भारतात तब्बल 40 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राहुल गांधी यांनी रविवारी ट्विटरवरुन भाजप सरकारवर निशाणा साधला. त्यांनी दावा केला की, सरकारच्या निष्काळजीपणामुळे भारतात 40 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यावेळी त्यांनी सर्व मृतांच्या कुटुंबियांना 4-4 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणीदेखली केली. राहुल गांधींनी आपल्या ट्विटसोबत न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टचा स्क्रीनशॉटदेखील शेअर केला आहे.
राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, "नरेंद्र मोदी स्वतः खरं बोलत नाहीत आणि इतरांनाही बोलू देत नाहीत. ते म्हणतात की, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात कोणाचाच मृत्यू झाला नाही. मी यापूर्वीही म्हटले होते की, कोरोनाच्या काळात सरकारच्या दुर्लक्षामुळे पाच लाख नाही तर 40 लाख भारतीयांचा मृत्यू झाला. मोदीजी तुमची जबाबदारी पार पाडा आणि प्रत्येक पीडित कुटुंबाला 4 लाख रुपयांची भरपाई द्या."