अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचा होकार की नकार? भूमिकेकडे लक्ष, काँग्रेसमध्ये विचारमंथन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 06:09 AM2022-08-20T06:09:08+5:302022-08-20T06:09:47+5:30
राहुल गांधी यांनी अध्यक्ष व्हावे, ही बहुतांश नेते व कार्यकर्त्यांची भावना आहे. तसे न झाल्यास सोनिया गांधी पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत अध्यक्षपदावर कायम राहतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक जवळ येत असतानाच राहुल गांधी पुन्हा एकदा पक्षाची सूत्रे स्वीकारण्यास तयार झाले नाहीत तर कोणता पर्याय असेल, याबाबत काँग्रेसमध्ये चर्चा सुरू झाली आहे. राहुल गांधी यांनी नकार दिला तर गांधी परिवारातील एखाद्या विश्वासपात्र नेत्याकडे सूत्रे द्यावीत किंवा पुन्हा एकदा सोनिया गांधी यांनीच पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळावी, याबाबत पक्षात विचारमंथन सुरू आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया २१ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे व २० सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर राहुल यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता व त्यानंतर सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत आहेत. सूत्रांनी सांगितले की, सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांचे म्हणणे आहे की, २०२४ च्या लोकसभा निवडणुका पाहता राहुल यांनी अध्यक्षपद स्वीकारले पाहिजे; परंतु राहुल यांच्याकडून होकाराची प्रतीक्षा आहे.
काँग्रेसच्या अन्य एका नेत्याने सांगितले की, राहुल गांधी अध्यक्ष न झाल्यास सोनिया गांधी पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत अध्यक्षपदावर कायम राहतील व दोन-तीन वरिष्ठ नेत्यांना कार्यकारी अध्यक्ष अथवा उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
निवडणुकीची दिशा राहुल यांच्यावर अवलंबून
काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, राहुल गांधी यांनी अध्यक्ष व्हावे, ही बहुतांश नेते व कार्यकर्त्यांची भावना आहे, यात कोणतेही दुमत नाही; परंतु यासाठी ते स्वत: तयार असणे गरजेचे आहे. राहुल गांधी अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार असल्याचे माझ्या माहितीनुसार तरी अद्याप कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. अनेक वेळा पक्षाच्या नेत्यांनी त्यांना पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्याचा आग्रह केलेला आहे; परंतु त्यांच्याकडून होकार मिळालेला नाही. आता या निवडणुकीची दिशा त्यांच्या होकार किंवा नकारावर अवलंबून आहे.