नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वत्कृत्वावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी निशाणा साधला आहे. सिंगापूरच्या नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठातील मोदींची मुलाखत स्क्रिप्टेड होती, असा टोला राहुल गांधींनी लगावला आहे. 1 जून रोजी सिंगापूरमध्ये मोदींची मुलाखत झाली. यावेळी उपस्थितांना थेट प्रश्न विचारले होते. मोदींच्या सिंगापूर दौऱ्यातील मुलाखतीवर राहुल गांधींनी जोरदार निशाणा साधला आहे. 'लोकांनी उत्स्फूर्तपणे विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देणारे मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान आहेत. विशेष म्हणजे मोदी काय उत्तरं देणार, हे त्यांच्या दुभाषकाला आधीच माहित होतं,' असा चिमटा राहुल यांनी काढला. 'बरं झालं, मोदींना खरंच लोकांनी थेट उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली नाहीत, अन्यथा मोदींसमोर पेचप्रसंग निर्माण झाला असता,' असं राहुल यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. 'मोदी देशाचे पहिले असे पंतप्रधान आहेत, ज्यांनी लोकांच्या उत्स्फूर्त प्रश्नांना उत्तरं दिली आणि ती उत्तरं त्यांच्या दुभाषकाला (ट्रान्सलेटरला) माहित होती. ते खरोखरच लोकांच्या उत्स्फूर्त प्रश्नांना सामोरे गेले नाहीत, हे खूप बरं झालं. नाहीतर ती आपल्या सर्वांसाठीच मोठी नामुष्की ठरली असती,' असं ट्विट करत राहुल गांधींनी त्यासोबत सिंगापूरमधील मुलाखतीच्या कार्यक्रमाचा एक व्हिडीओदेखील जोडला आहे.
...असा कारनामा करणारे मोदी पहिलेच पंतप्रधान; राहुल गांधींचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2018 7:23 PM