राहुल गांधी, तुम्ही संयमाने बोला! लोकसभाध्यक्षांना असे का म्हणावे लागले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 06:38 AM2023-08-10T06:38:54+5:302023-08-10T06:41:38+5:30
लोकसभेचे रद्द झालेले सदस्यत्व सर्वोच्च न्यायालयाने बहाल केल्यानंतर सभागृहात परतलेल्या राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्याला केंद्रस्थानी ठेवून अविश्वास प्रस्तावावरील भाषणाची सुरुवात केली
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्रातील सरकारने मणिपूरमध्ये भारतमातेची, देशाची, हिंदुस्थानची हत्या केली. तुम्ही देशभक्त नाही, देशद्रोही आहात. तुम्ही भारतमातेचे रक्षणकर्ते नाही तर भारतमातेचे हत्यारे आहात. तुम्ही मणिपूरपाठोपाठ हरयाणात आणि संपूर्ण देशात केरोसिन शिंपडत असून साऱ्या देशाला जाळण्यात गुंतलेले आहात, असा जोरदार हल्ला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केला.
लोकसभेचे रद्द झालेले सदस्यत्व सर्वोच्च न्यायालयाने बहाल केल्यानंतर सभागृहात परतलेल्या राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्याला केंद्रस्थानी ठेवून अविश्वास प्रस्तावावरील भाषणाची सुरुवात केली आणि नंतर अतिशय आक्रमक आवेशात मणिपूरवरील केंद्र सरकारच्या भूमिकेचा समाचार घेतला.
भारत हा आमच्या जनतेच्या हृदयाचा आवाज आहे; पण मणिपूरच्या लोकांना जिवे मारून तुम्ही भारताची हत्या केली आहे. त्यामुळेच तुमचे पंतप्रधान मणिपूरमध्ये जाऊ शकत नाहीत, असा हल्लाबोल त्यांनी केला.
लंकेला रावणाच्या अहंकाराने जाळले
राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदुस्थानच्या हृदयाचा आवाज ऐकत नसतील तर ते कोणाचा आवाज ऐकतात? ते दोनच लोकांचा आवाज ऐकतात. रावण दोनच लोकांचे ऐकायचा. मेघनाद आणि कुंभकर्णाचे. तसेच, नरेंद्र मोदी दोन लोकांचेच ऐकतात. अमित शाह आणि अदानींचे. लंकेला हनुमानाने नाही जाळले. लंकेला रावणाच्या अहंकाराने जाळले, असे राहुल गांधी म्हणाले. रामाने रावणाला मारले नाही. रावणाला त्याच्या अहंकाराने मारले, असे राहुल गांधी म्हणाले. त्यावर हे सभागृह आहे. तुम्ही संयमाने बोला, असे आवाहन अध्यक्ष बिर्ला यांनी राहुल गांधी यांना केले.