नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी (22 जुलै) आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आणि नेतेमंडळींना संबोधित करताना भाजपा आणि आरएसएसकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे. रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली, यावेळी राहुल गांधींनी आपल्या कार्यकर्त्यांना हा सल्ला दिला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आक्रमक पद्धतीने मैदानात उतरणार असून, किमान 300 जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णयही पक्षाने घेतला आहे. या निवडणुकांसाठी कोणत्या पक्षांशी आघाडी करायची, याचे सर्वाधिकार कार्यकारिणीने पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यात आलेत.
(लोकसभा निवडणूक; काँग्रेसचे मिशन ३००)
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, सर्वसामान्य लोकांमध्ये जा आणि कार्य करा. भाजपा-आरएसएस जनतेमध्ये जाऊन कामं करतात, मात्र आपले नेते काम करताना संकोच बाळगतात. भाजपा आणि आरएसएसकडून शिका, असा सल्ला यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. शोषित-पीडितांसाठी काँग्रेसने लढा देणे गरजेचे आहे, असे आवाहनही राहुल गांधी यांनी या बैठकीत केले. ज्यांनी गेल्या निवडणुकीत काँग्रेसला मते दिली नाहीत, त्यांच्यापर्यंत पोहोचा, त्यांचा विश्वास संपादन करा, असा संदेशही त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला.('मुस्लिमांच्या तुलनेत गाय सर्वाधिक सुरक्षित', शशी थरुर यांचं वादग्रस्त ट्विट)दरम्यान, काँग्रेसच्या नेत्यांकडून होणाऱ्या वादग्रस्त विधानांच्या पार्श्वभूमीवरही राहुल गांधींनी नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांना समज दिली. कोणतेही विधान करताना भाषेची मर्यादा पाळावी, अशी समज त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली. दलित, आदिवासी, मागासवर्गीय, गरीब, विविध यंत्रणा व घटनात्मक संस्था यांच्यावर भाजपा पद्धतशीरपणे हल्ले चढवत आहे, असल्याचा आरोप करून राहुल गांधी म्हणाले, की काँग्रेसच हा भारताचा खरा आवाज (व्हॉइस ऑफ इंडिया) आहे. पक्षाच्या मतदारांचा पाया विस्तारणे हे आपल्यापुढील महत्त्वाचे लक्ष्य आहे.