Rahul Gandhi Net Worth: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी केरळच्या वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राहुल यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले, ज्यातून त्यांच्या संपत्तीचा खुलासा झाला आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, राहुल यांची जंगम मालमत्ता 9,24,59,264 रुपये आहे, तर स्थावर मालमत्ता सुमारे 11,14,02,598 रुपयांची आहे. याशिवाय त्यांच्यावर सुमारे 49.79 लाख रुपयांचे कर्जही आहे.
राहुल गांधींनी आपल्या उत्पन्नासोबतच शेअर्स आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचाही खुलासा केला आहे. राहुल गांधी यांच्या पोर्टफोलिओमध्ये 25 कंपन्यांचे शेअर्स आहेत, ज्यामध्ये त्यांनी 4.30 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या काळात आलेल्या RBI च्या सॉवरेन गोल्ड बाँड योजनेतही गुंतवणूक केली आहे.
काय आहे सोवरेन गोल्ड बॉंड योजना?पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात RBI ने नोव्हेंबर 2015 मध्ये ही योजना सुरू केली होती. सोवरेन गोल्ड बॉंड योजना 8 वर्षांसाठी सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी देते. या योजनेअंतर्गत 2.50% वार्षिक परतावा निश्चित केलेला आहे. यानंतर बाजारातील चढ-उतारानुसार परतावा मिळतो. याचा अर्थ, सोने जितके महाग असेल तितके जास्त परतावे मिळतील.
या योजनेचा पहिला हप्ता 30 नोव्हेंबर 2023 रोजी मॅच्युअर झाला. आठ वर्षांत या योजनेने 12.9 टक्के परतावा दिला आहे. राहुल गांधी यांची या योजनेत 15.27 लाख रुपयांची गुंतवणूक आहे. याशिवाय, गांधी यांच्या पीपीएफ खात्यात 61.52 लाख रुपये असून, त्यांच्याकडे 4.20 लाख रुपयांचे 333.30 ग्रॅम सोने आहे.