मडगाव- काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी काल रात्री गोव्यात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राहुल गांधींनी पहिल्यांदाच गोव्याला भेट दिली आहे. दक्षिण गोव्यातील सोनिया गांधी थांबलेल्या लीला या पंचतारांकित हॉटेलमध्येच ते थांबले आहेत.गांधी परिवाराची ही खासगी भेट असून, यात पक्षाचा कोणताही सहभाग नाही. राहुल गांधींच्या गोवा भेटीसंदर्भात मीसुद्धा अनभिज्ञ होतो, वरिष्ठ नेत्यांची खासगी भेट ही गोपनीय ठेवण्यात येते, असं विधान गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी केलं आहे. कदाचित गांधी परिवाराला नवीन वर्ष गोव्यात सेलिब्रेट करायचं असेल. गोवा हे गांधी परिवाराचं सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आवडतं ठिकाण राहिलंय. त्यामुळे ते आम्हाला निमंत्रण देत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या भेटीत आम्ही व्यत्यय आणू इच्छित नाही, असं एका काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं आहे.तर गेल्या काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची धुरा राहुल गांधी यांच्या हाती सोपविल्यानंतर निश्चिंत झालेल्या सोनिया गांधी गोव्यात सुट्टीवर आल्या आहेत. 26 डिसेंबर रोजी त्या दिल्लीहून गोव्याला रवाना झाल्या होत्या. दक्षिण गोव्यातील लीला या पंचतारांकित हॉटेलमध्ये काही मोजक्या मित्रमंडळींसह त्या आल्या आहेत. सरत्या वर्षाला निरोप देउन नववर्षाचे स्वागत केल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्या गोव्याचा निरोप घेतील. काँग्रेस अध्यक्ष बनल्यानंतर देशभर दौरे करण्यात राहुल गांधी व्यग्र असताना सोनिया गांधींनी गोव्याला जाणे पसंत केले. बुधवारी सकाळी नाश्त्यात त्यांनी आवडता मसाला डोसा मागविला होता. त्यानंतर हॉटेलच्या आवारात मनमुराद सायकलिंग केले. तसेच विदेशांतील पाहुण्यांशी चर्चा केली.अनेक चाहत्यांना त्यांनी आपल्यासोबत सेल्फीही घेऊ दिले होते. योगा करण्याबरोबरच पुस्तकांचे वाचन करून त्या वेळ व्यतित करत आहेत. मात्र बातम्यांपासून दूर राहण्याची खबरदारी त्या घेत आहेत. गेल्या वर्षीसुद्धा नवीन वर्षांचं सेलिब्रेशन करण्यासाठी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका वडेरा या गोव्यात दाखल झाले होते. त्यानंतर राहुल गांधी गोव्यातून परतले होते. परंतु प्रियंका वढेरा या आई सोनिया गांधींसोबत गोव्यात थांबल्या होत्या.
नववर्षाच्या स्वागतासाठी सोनिया गांधींपाठोपाठ राहुल गांधीही पोहोचले गोव्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 11:42 AM