Rahul Gandhi on Agniveer Scheme : विरोधी पक्षनेते राहुल गांधी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अग्निवीर योजनेवरुन सरकारला घेरलं आहे. अग्नीवीरांना योग्य भरपाई मिळत नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केल्यानंतर संसदेत मोठा गदारोळ उडाला. राहुल गांधी यांच्या आरोपानंतर सरकारने स्पष्टीकरण आणि भारतीय सैन्याने पुरावे दिले होते. मात्र त्यानंतरही आता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा या योजनेवरुन सरकारवर निशाणा साधला. शहीद कुटुंबाला आजपर्यंत भरपाई मिळाली नसल्याचा पुनरुच्चार राहुल गांधी यांनी केला आणि मोदी सरकार अग्निवीर जवानांशी भेदभाव करत असल्याचा आरोप केला.
पंजाबचे शहीद अग्निवीर अजय कुमार यांच्या कुटुंबाला सरकारने कोणतीही भरपाई दिली नसून कुटुंबाला फक्त विम्याची रक्कम मिळाली असल्याचा दावा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ जारी करत सरकारवर निशाणा साधला. शहीद अग्निवीर अजय कुमार जी यांच्या कुटुंबाला आजपर्यंत सरकारकडून कोणतीही भरपाई मिळाली नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं. तसेच नुकसानभरपाई आणि विमा यात फरक असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटलं.
अग्निवीर अजय कुमारच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याचा वाद शुक्रवारी तीव्र झाला. राहुल गांधी यांनी शहीद अजय कुमारच्या कुटुंबाला आजपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा पुनरुच्चार केला आणि मोदी सरकार अग्निवीर यांच्याशी भेदभाव करत असल्याचा आरोप केला. राहुल गांधी त्यांच्या एक्सपोस्टसोबत व्हिडीओ जारी करत सरकारवर टीका केली.
"शहीद अजय कुमार यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून जी मदत मिळायला हवी होती ती अद्याप मिळालेली नाही. 'भरपाई' आणि 'विमा' यात फरक आहे. हुतात्माच्या कुटुंबाला विमा कंपनीनेच पैसे दिले आहेत. शहीद अजय कुमार यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून जी मदत मिळायला हवी होती ती मिळालेली नाही. देशासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक शहिदाच्या कुटुंबाचा सन्मान व्हायला हवा पण मोदी सरकार त्यांच्याशी भेदभाव करत आहे. सरकार काहीही म्हणेल पण हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे आणि मी तो मांडतच राहीन. इंडिया आघाडी सैन्याला कधीही कमकुवत होऊ देणार नाही," असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांच्या आरोपानंतर कर्तव्यादरम्यान आपला जीव गमावलेल्या अग्निवीर अजय कुमारच्या कुटुंबाला भरपाई दिली गेली नसल्याचा दावा लष्कराने फेटाळला होता. या कुटुंबाला देय रकमेपैकी ९८.३९ लाख रुपये आधीच देण्यात आल्याचे लष्कराने सांगितले होते. "भरपाईची एकूण रक्कम सुमारे १.६५ कोटी रुपये असेल. अग्निवीर योजनेच्या नियमानुसार पोलीस पडताळणीनंतर ६७ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे," असे भारतीय लष्कराने स्पष्टीकरणात म्हटलं होतं.