ऑनलाइन लोकमत -
गोरखपूर, दि. 09 - भारतीय जनता पक्षाच्या पोस्टरमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 'अब की बार योगी सरकार' ची घोषणा देत लावण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये स्थानिक खासदार योगी आदित्यनाथ वाघावर स्वार झालेले दाखवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना गाढव म्हणण्यात आले आहे. राहुल गांधींसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती आणि एमआयएम अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याही फोटोंसमोर गाढवाचं चित्र लावण्यात आलं आहे. भाजपाच्या अल्पसंख्यांक गटाने हे पोस्टर लावले आहे. या पोस्टरवर 'अब की बार योगी सरकार' असं लिहिण्यात आलं आहे.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना सिंघम म्हणून दाखवणारे पोस्टर काँग्रेसकडून लावण्यात आले होते. त्यानंतर भाजपाने हे पोस्टर लावले आहेत. 'आम्हाला योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं आहे. 2017 निवडणुकीत भाजपा घवघवीय यश मिळवेल', असा विश्वास भाजपाच्या अल्पसंख्यांक गटाचे राज्य कार्यकारिणी सदस्य इरफान अहमद यांनी व्यक्त केला आहे.
आम्ही अहिंसेवर विश्वास ठेवतो. हिंसक लोकच वाघावर स्वार होतात अशी टीका समजवादी पक्षाचे मोहसीन खान यांनी केली आहे. तर दुसरीकडे एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीर सिद्दीकी यांनी याविरोधा निदर्शन करण्याचा इशारा दिला आहे. या पोस्टरमुळे भाजपाचा खरा चेहरा उघड झाल्याचं बहुजन समाज पक्षाचे ब्रिजेश कुमार यांनी म्हटलं आहे.