'पीएम नरेंद्र मोदींचे अंतिम लक्ष्य संविधान रद्द...', भाजप खासदाराच्या वक्तव्यावर राहुल गांधींचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 14:53 IST2024-03-10T14:50:34+5:302024-03-10T14:53:06+5:30
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

'पीएम नरेंद्र मोदींचे अंतिम लक्ष्य संविधान रद्द...', भाजप खासदाराच्या वक्तव्यावर राहुल गांधींचा पलटवार
कर्नाटकमधील भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केलेल्या संविधानावरील विधानामुळे नवा वाद सुरू झाला आहे. हेगडे यांनी राज्यघटनेच्या बहुतांश भागांचे पुनर्लेखन करण्याची गरज असल्याचे म्हटले होते, यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर आता खासदार राहुल गांधी यांनी पलटवार केला आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजप संविधान रद्द करू इच्छित असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासह गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस-टीएमसी युती नाही, मुख्यमंत्री ममत बॅनर्जी आज ४२ उमेदवारांची घोषणा करणार
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करुन टीका केली. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले की,'संविधान बदलण्यासाठी ४०० जागा हव्यात, असे भाजप खासदारांचे वक्तव्य म्हणजे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या संघ परिवाराच्या छुप्या हेतूची जाहीर घोषणा आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपचे अंतिम ध्येय बाबासाहेबांचे संविधान नष्ट करणे हे आहे. त्यांना न्याय, समानता, नागरी हक्क आणि लोकशाहीचा तिरस्कार आहे. समाजात फूट पाडून, माध्यमांना गुलाम बनवून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करून आणि स्वतंत्र संस्थांना पांगळे करून, विरोधकांना संपवण्याचा कट रचून भारताच्या महान लोकशाहीला संकुचित हुकूमशाहीत बदलायचे आहे, अशी टीका गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी म्हणाले, 'स्वातंत्र्य वीरांच्या स्वप्नांसह हे कटकारस्थान आम्ही यशस्वी होऊ देणार नाही आणि संविधानाने दिलेल्या लोकशाही हक्कांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू. संविधानाचा प्रत्येक सैनिक, दलित, आदिवासी, मागास आणि अल्पसंख्याकांनो, जागे व्हा, आवाज उठवा, इंडिया तुमच्या पाठीशी आहे.
उत्तर कन्नडचे विद्यमान खासदार हेगडे म्हणाले होते की, तुम्ही सर्वांनी भाजपला ४०० हून अधिक जागा जिंकून देण्यासाठी मदत करा, यामागचे कारणही त्यांनी सांगितले. भाजप खासदार म्हणाले की, भाजपला ४०० पेक्षा जास्त जागा कशाला हव्या आहेत कारण काँग्रेस नेत्यांनी यापूर्वी संविधानात बदल केले होते आणि हिंदू धर्माला अग्रस्थानी ठेवले नव्हते. हे बदलून आपला धर्म वाचवायचा आहे.
"लोकसभेत आमच्याकडे आधीच दोन तृतीयांश बहुमत आहे आणि राज्यसभेत आमच्याकडे संविधान दुरुस्तीचे बहुमत नाही. ४०० अधिक संख्या आम्हाला हे साध्य करण्यात मदत करेल, असंही त्यांनी विधान केले होते, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
भाजपा सांसद का बयान कि उन्हें 400 सीट संविधान बदलने के लिए चाहिए, नरेंद्र मोदी और उनके ‘संघ परिवार’ के छिपे हुए मंसूबों का सार्वजनिक ऐलान है।
नरेंद्र मोदी और भाजपा का अंतिम लक्ष्य बाबा साहेब के संविधान को ख़त्म करना है। उन्हें न्याय, बराबरी, नागरिक अधिकार और लोकतंत्र से नफ़रत…— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 10, 2024