राहुल गांधींसह विरोधकांना श्रीनगरहून परत पाठविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 06:31 AM2019-08-25T06:31:37+5:302019-08-25T06:32:00+5:30
काश्मीरमध्ये सारे आलबेल आहे, असे केंद्र सरकार सांगत असले, तरी परिस्थिती चांगली नाही आणि म्हणूनच आम्हाला श्रीनगरमध्ये मज्जाव केला, अशी टीका राहुल गांधी यांनी दिल्लीत केली.
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांना सुरक्षा यंत्रणांनी शनिवारी दुपारी श्रीनगर विमानतळारूनच दिल्लीला पाठविले. काश्मीरमधील परिस्थिती पाहण्यासाठी व स्थानिक लोकांशी संवाद साधण्यासाठी हे नेते निघाले होते.
काश्मीरमध्ये सारे आलबेल आहे, असे केंद्र सरकार सांगत असले, तरी परिस्थिती चांगली नाही आणि म्हणूनच आम्हाला श्रीनगरमध्ये मज्जाव केला, अशी टीका राहुल गांधी यांनी दिल्लीत केली. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, काश्मीरमधील स्थिती अतिशय वाईट आहे, असे आम्हाला विमानातील प्रवाशांनीच सांगितले, पण केंद्र सरकार हे देशातील जनतेपासून लपवू पाहत आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांची ही गळचेपी असल्याचा आरोप सीताराम येचुरी यांनी केला.
राहुल गांधी यांच्यासह आनंद शर्मा, माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा, द्रमुकचे टी शिवा, तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी, मनोज झा, माजिद मेमन, शरद यादव हे नेते होते. दुपारी त्यांचे विमान श्रीनगर विमानतळावर अडवून तुम्हाला बाहेर जाता येणार नाही, असे पोलिसांनी त्यांना सांगितले.
Rahul Gandhi: Some days ago I was invited by Governor to visit J&K.I accepted the invitation. We wanted to get a sense of what ppl are going through, but we weren't allowed beyond the airport. Press ppl with us were mishandled,beaten. It's clear that situation in J&K isn't normal pic.twitter.com/1XKyaUcg06
— ANI (@ANI) August 24, 2019
हे नेते येणार असल्याचे कळताच, प्रशासनाने राजकीय नेत्यांना येण्यास परवानगी नाही आणि त्यांनी येण्याचा प्रयत्न केल्यास त्यास निर्बंधांचे उल्लंघन समजून कारवाई केली जाईल, असे शुक्रवारी जाहीर केले होते. राजकीय नेत्यांच्या येण्याने काश्मीरमधील परिस्थिती बिघडू शकते, असेही प्रशासनाने म्हटले होते.