नवी दिल्ली : राफेल डील प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला दुसऱ्यांदा क्लीन चिट मिळाल्यानंतर भाजपाने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राफेल विरोधातील पुनर्विचार याचिकेवर गुरुवारी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. यावेळी राफेल विरोधातील सर्व याचिका कोर्टाने फेटाळल्या असून चौकशीची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावरून भाजपाने सत्याचा विजय झाल्याचे सांगत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
भाजपाचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राफेल विरोधात जाणून-बुजून कट रचल्याचा आरोप रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर केला. राहुल गांधी यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. कारण, त्यांनी खोटे सांगितले होते की, फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींनी पंतप्रधानांना चोर म्हटले आहे. मात्र, याबाबत राष्ट्रपतीनींच खंडन केले आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले. तसेच, डिफेंस कॉन्ट्रॅक्टमध्ये कॉन्ट्रॅक्ट घेण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे. जे लोक कॉन्ट्रॅक्टमध्ये यशस्वी झाले नाहीत. त्यांनी राफेलला सुद्धा उशिर करण्यास प्रयत्न केले होते, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.
याचबरोबर, भ्रष्टाचारात बुडालेली काँग्रेस चुकीचा प्रचार करत आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितले होते की, देशाच्या सुरक्षतेसाठी लष्कराला योग्य टेक्नॉलॉजी, मटेरियल आणि शस्त्रसाठा मिळावा. राफेल डीलवर प्रत्येक नियमांचे पालन करण्यात आले. मात्र, काँग्रेसने याचा चुकीचा प्रचार केला. सुप्रीम कोर्टात पराभव झाल्यानंतर काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी राफेल डीलचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत आणला होता. तरी सुद्धा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आणि आता सुप्रीम कोर्टातही काँग्रेसचा पराभव झाल्याचे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.
दरम्यान, राफेल विमाने खरेदी करण्याचा व्यवहार रद्द व्हावा या मागणीसाठी केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने याआधीच फेटाळून लावली होती. या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. याप्रकरणीचा निकाल मे महिन्यात राखून ठेवण्यात आला होता. तसेच, राफेल खरेदी व्यवहारामध्ये मोदी सरकारने मोठा घोटाळा केला आहे, असा जाहीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात केला होता. त्यावरून त्यांनी रान उठविले होते.