अलीगड - उत्तर प्रदेशमधील अलीगडमध्ये कर्जासाठी अडीच वर्षाच्या चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दाम्पत्याने 10 हजार रुपयांचे कर्ज थकवल्याने त्यांच्या अडीच वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ट्विंकल असं या चिमुकलीचं नाव आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून तपासात दिरंगाई केल्यामुळे पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या घटनेने देशभरातून संताप व्यक्त होत असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी चिमुकलीच्या कुटुंबीयांना न्याय द्या तसेच आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी 'अलीगडमध्ये घडलेली घटना ही अत्यंत धक्कादायक आहे. या घटनेमुळे मी विचलित झालो आहे. एखाद्या लहान मुलीची अशाप्रकारे क्रौर्याने हत्या करायला माणसांचे हात कसे काय तयार होतात? ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. या प्रकरणी न्याय झालाच पाहिजे' असं ट्वीट केलं आहे.
'अलीगडमध्ये जी घटना घडली ती अमानवी आणि क्रौर्याचा कळस गाठणारी घटना आहे. त्या मुलीच्या आई वडिलांना आता काय वाटत असेल याचा विचार करायलाही भीती वाटते. जे अपराधी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे' असं ट्वीट प्रियंका गांधी यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशच्या अलीगडमध्ये टप्पल परिसरात एक दाम्पत्य राहते. त्यांची अडीच वर्षाची मुलगी ट्विंकल ही चार दिवसांपासून घरातून बेपत्ता झाली होती. त्यानंतर गावाबाहेरील कचराकुंडीजवळ तिचा मृतदेह सापडला होता. हत्या करणाऱ्यांनी मुलीचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न देखील केला होता. तसेच मृतदेह कचराकुंडीत फेकल्याने भटके कुत्रे तिच्या मृतदेहाजवळ असलेले काही ग्रामस्थांनी पाहिलं. त्यानंतर त्यांनी लगेचच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी याप्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली.
पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी कर्जासाठी अडीच वर्षाच्या मुलीची हत्या केल्याचं सांगितलं. आरोपींचा मुलीच्या आई-वडिलांशी पैशांवरून वाद झाला होता. दाम्पत्याने त्यांच्याकडून दहा हजारांचे कर्ज घेतले होते. मात्र त्या कर्जाची त्यांनी परतफेड केली नसल्याने वाद झाला होता. त्यातूनच आरोपींनी दाम्पत्याला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिली होती. मुलीच्या वडिलांनी दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे.