नवी दिल्ली - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी सोमवारी (11 फेब्रुवारी) दिल्लीमध्ये एकदिवसीय उपोषणाला सुरुवात केली आहे. महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नायडूंची भेट घेतली आहे. तसेच काँग्रेसने या उपोषणाला पाठिंबा देत मोदी सरकारवर टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी 'मी आंध्र प्रदेशच्या लोकांसोबत आहे. हे कोणत्या प्रकारचे पंतप्रधान आहेत ? आंध्र प्रदेशच्या लोकांना दिलेलं आश्वासन मोदींनी पूर्ण केलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास गमावला आहे. जिथे जातात तिथे ते खोटं बोलतात. मोदींनी राफेल विमान खरेदीत घोटाळा केला. चौकीदार चोर है' असं म्हणत मोदींवर जोरदार टीका केली आहे.
पंतप्रधान मोदींना 'ना घर, ना मुलगा', पत्नीचं नाव घेत चंद्राबाबूंचा मोदींवर पलटवारआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका केली होती. आपल्यावर केलेल्या टीकेला प्रतिउत्तर देताना चंद्राबाबू यांनी मोदींना पत्नी जशोदाबेन यांच्यावरुन लक्ष्य केलं होतं. तुम्ही तुमच्या पत्नीला दूर केलं, तुमच्या कुटुंबाबद्दल तुमच्या मनात थोडातरी आदर आहे का ? मी माझ्या कुटुंबाचा सन्मान करतो, माझ्या कुटुंबावर माझं प्रेम आहे, अशा शब्दात चंद्राबाबू यांनी मोदींवर कौटुंबिक वादातून टीका केली होती.