नवी दिल्ली - निर्भया बलात्कार प्रकरणानंतर भेदरलेल्या संपुर्ण कुटुंबाची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काळजी घेतली. त्यांनी फक्त भावनिक नाही, तर आर्थिक मदतही केली. महत्वाचं म्हणजे त्यांनी यासंबंधी कोणताही गाजावाजा केला नाही अशी माहिती निर्भयाच्या वडिलांनी आयएएनएस वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. निर्भयाचे वडील बद्रिनाथ सिंह यांनी सांगितलं की, '2012 मध्ये आमच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर अनेकजण मदतीसाठी पुढे आले होते. मात्र फक्त राहुल गांधी एकमेव होते जे आमच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले. विशेष म्हणझे आपण मदत करत असल्याची माहिती गुप्त ठेवण्यास त्यांनी सांगितलं होतं'.
'त्या घटनेने आमच्या मनावर एक कायमची जखम सोडली होती, पण राहुल गांधी एका देवदूताप्रमाणे आले. राजकारणाचा भाग असो अथवा काहीही पण राहुल गांधी आमच्यासाठी देवदूत आहेत', अशी भावना बद्रिनाथ सिंह यांनी व्यक्त केली आहे. 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. मृत्यूशी झुंज देणा-या निर्भयाचा 13 दिवसांनी मृत्यू झाला होता.
राहुल गांधी यांनी निर्भयाच्या भावाला वैमानिक होण्यासाठीही मदत केली अशी माहिती बद्रिनाथ सिंह यांनी दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, आपल्याला राजकारणात कोणताही रस नसून, राहुल गांधींची स्तुती करण्यामागे कोणताही राजकीय अजेंडा नाही.
'माझा मुलगा सध्या वैमानिक आहे. नुकतंच त्याने प्रशिक्षण पुर्ण केलं आहे. इंडिगो एअरलाईन्समध्ये तो काम करत आहे. हे सर्व राहुल गांधींमुळेच शक्य झालं', असं बद्रिनाथ सिंह यांनी सांगितलं आहे. बद्रिनाथ सिंह सध्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करतात.
याआधी निर्भयाच्या आईनेही राहुल गांधींमुळे आपला मुलगा आज वैमानिक झाला असल्याची भावना करत आभार मानले होते. 'निर्भया प्रकरणामुळे आम्ही पार कोलमडून गेलो होतो. अनेक जणांनी सांत्वन केले, मदतीचा हात पुढे केला. त्यात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वड्रा याही होत्या. त्या नियमितपणे आमच्या संपर्कात होत्या', असे त्यांनी सांगितले आहे. 'राहुल यांनीच आपल्या मुलाला वैमानिक होण्याचा सल्ला दिला. एवढेच नव्हे तर, त्याच्या शिक्षणाचा सारा खर्चही त्यांनीच केला. ते नियमितपणे त्यांच्या संपर्कात होते. ते त्याला प्रोत्साहन देत राहिले. खटल्याच्या बातम्यांमुळे त्याचे मन विचलित होत असे. अशा काळात त्याला सावरण्याचे कामही त्यांनी केले', अशी माहिती त्यांनी दिली होती.