नवी दिल्लीकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी झालेल्या संरक्षक विषयक संसदीय समितीच्या बैठकीतून 'वॉक आउट' केलं. भारतीय लष्करातील जवानांचा गणवेश बदलण्याच्या मुद्द्यावरुन राहुल गांधी या बैठकीत चांगेलत संतापले.
"जवानांना कशा पद्धतीचा गणवेश असावा हे समितीतील खासदार ठरवू शकत नाहीत. तो आपला अधिकार नाही. सैन्य दलांच्या प्रमुखांनाच याचा निर्णय घेऊ देत", असं सांगत राहुल गांधी यांनी चर्चेला विरोध केला. त्यानंतर बैठकीचे अध्यक्ष जूएल ओरम आणि राहुल गांधी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर राहुल यांनी थेट बैठकीतून निघून जाण्याचा निर्णय घेतला.
संरक्षक विषयक संसदीय समितीचे अध्यक्ष जूएल ओरम यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत आज बैठक झाली. यावेळी 'चिफ ऑफ डिफेन्स' (सीडीएस) बिपीन रावत देखील उपस्थित होते.
बैठकीतून बाहेर येताच राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. "संसदीय समितीने सैन्याच्या गणवेशावर चर्चा करुन वेळ वाया घालवला. त्याऐवजी सैन्याला कशाप्रकारे अधिक सुसज्ज करता येईल यावर चर्चा होणं अपेक्षित होतं", असं राहुल गांधी म्हणाले.
सुत्रांच्या माहितीनुसार, सीडीएस बिपीन रावत बैठकीत सैन्य दलाच्या नव्या गणवेशाबाबत माहिती देत होते. यावेळी राहुल गांधी यांनी चर्चेत हस्तक्षेप करत काही प्रश्न उपस्थित केले. लडाखमध्ये सैन्याची काय तयारी आहे? चीनविरोधात आपली काय रणनिती आहे? अशा प्रश्नांची सरबत्ती करत राहुल यांनी या मुद्द्यांवर चर्चेची मागणी केली. यावरुन बैठकीचे अध्यक्ष जूएल ओरम आणि राहुल गांधी यांच्यात वाद झाला. अखेर राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी बैठकीतून 'वॉक आउट' केले.