देशात लोकसभा निवडणुकीचे ढग जमू लागले असल्यानं घोषणांचा रिमझिम पाऊस पडू लागला आहे. सवर्णांना दिलेलं आरक्षण, जीएसटी दरातील कपात, अयोध्येतील राम मंदिर प्रकरणाला आलेला वेग यातून केंद्रातील मोदी सरकारनं निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचं दिसतंय. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही आज एक मोठी घोषणा करून निवडणूक प्रचाराचा शंख फुंकला आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीचा फॉर्म्युला हिट ठरल्यानंतर, आता काँग्रेसनं गरिबांना साद घातली आहे.
'काँग्रेस पक्षाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणूक जिंकल्यास सत्ता स्थापनेनंतर लगेचच देशातील प्रत्येकाला किमान उत्पन्नाची हमी दिली जाईल', असं आश्वासन राहुल गांधी यांनी आज छत्तीसगडमधील जाहीर सभेत दिलं.
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. काँग्रेसच्या नेत्यांनी गंगाजल हातात घेऊन, कृषिकर्ज माफ करण्याची शपथच घेतली होती. त्याचा पक्षाला चांगलाच फायदा झाला आणि तब्बल १५ वर्षांनंतर या विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकला. या विजयाबद्दल शेतकऱ्यांचे आभार मानण्यासाठी आज राहुल यांची सभा झाली. त्यावेळी त्यांनी भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडलं.
आम्ही विरोधी पक्षात असताना जेव्हा जेव्हा शेतकरी कर्जमाफीची मागणी करायचो, तेव्हा सरकारचं एकच उत्तर असायचं - आमच्याकडे पैसे नाहीत. देशाच्या चौकीदाराकडे छत्तीसगडच्या शेतकऱ्यांसाठी ६ हजार कोटी रुपये नाहीत, पण अंबानीला द्यायला ३० हजार कोटी रुपये आहेत, असा टोला राहुल गांधींनी हाणला. मेहुल चोक्सी पैसे घेऊन पसार होऊ शकतो, पण शेतकऱ्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, असंही त्यांनी सुनावलं. याउलट, काँग्रेसने सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांचं कर्ज माफ केल्याचं त्यांनी नमूद केलं.