Rahul Gandhi (Marathi News) सुलतानपूर : मानहानी प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी मंगळवारी (20 फेब्रुवारी) उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील खासदार-आमदार न्यायालयानेराहुल गांधी यांना जामीन मंजूर केला. राहुल गांधी हे 'भारत जोडो न्याय यात्रा' थांबवून या प्रकरणी न्यायलयात हजर राहण्यासाठी पोहोचले होते. हे संपूर्ण प्रकरण 2018 सालचे आहे, जे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संबंधित आहे.
राहुल गांधी यांनी एका जाहीर सभेत अमित शाह यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजपा नेते विजय मिश्रा यांनी 4 ऑगस्ट 2018 रोजी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. दरम्यान, 8 मे 2018 रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान बंगळुरू येथे झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी भाजपाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्यावर खुनाचा आरोप केला होता, असा आरोप विजय मिश्रा यांनी केला होता.
राहुल गांधी न्यायालयात हजर राहण्यापूर्वी भाजपा नेते विजय मिश्रा म्हणाले की, राहुल गांधींनी अमित शाहांना 'किलर' म्हटले होते. अनेक अपशब्द वापरले होते, आम्ही त्यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. तसेच, भाजपा हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. अशा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला खुनी संबोधले जाईल, हे अन्यायकारक आहे. यामुळे आम्हाला खूप दुःख झाले, त्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर दबाव आणला आणि आम्ही तक्रार दाखल केली, असे विजय मिश्रा यांनी सांगितले होते.
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सांगितले होते की, राहुल गांधी यांना 20 फेब्रुवारी रोजी सुलतानपूर येथील उत्तर प्रदेश जिल्हा न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. हे प्रकरण भाजपा नेत्याने 4 ऑगस्ट 2018 रोजी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याशी संबंधित आहे. तसेच, भारत जोडो न्याय यात्रा 20 फेब्रुवारीला सकाळी थांबेल आणि दुपारी 2 वाजता फुरसातगंज, अमेठी येथून पुन्हा कार्यक्रम सुरू होईल.