शीलेश शर्मा, नवी दिल्लीकाँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्डप्रकरणी येत्या १९ डिसेंबरला अटक झाल्यास पक्षातर्फे देशभरात जेलभरो आंदोलनाची तयारी करण्यात येत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्ष नेतृत्वाने काँग्रेसच्या सर्व प्रदेश शाखांना सज्ज राहण्यास सांगितले आहे. दिल्लीतील न्यायालयातही १९ तारखेला काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर राहतील. न्यायालयाने याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल यांना या दिवशी जातीने न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे राहुल गांधी यांनी आपण कुठल्याही परिस्थितीत जामीन घेणार नाही असे स्पष्ट केले असल्याने त्यांचे तुरुंगात जाणे निश्चित मानले जात आहे. आतापर्यंत मिळालेल्या वृत्तानुसार सोनिया गांधी आणि मोतीलाल व्होरा यांच्या जामिनाचे दस्तावेज तयार होत असून अमेरिकेत वास्तव्याला असलेले सॅम पित्रोदा यांची न्यायालयात हजर राहण्याची शक्यता कमी आहे. परंतु पक्षश्रेष्ठींनी त्यांना संपूर्ण घडामोडींची कल्पना दिली आहे. युवक काँग्रेस, एनएसयूआय, महिला काँग्रेस आणि दिल्ली प्रदेश काँग्रेस आपआपल्या पातळीवर कामाला लागली आहे.
राहुल गांधींना अटक झाल्यास ‘जेलभरो’
By admin | Published: December 11, 2015 11:49 PM