ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 8 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. राहुल गांधी मंदसौर येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना अटक केलं. राहुल गांधी पोलिसांना चकवा देत बाईकवरुन जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केलं. सुरुवातीला राहुल गांधींनी जामीन घेण्यास नकार दिला होता. मात्र सध्या त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.
मंदसौर येथे वातावरण चिघळलं असल्याने पोलिसांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दौ-याला परवानगी नाकारली होती. पोलिस अधीक्षकांनी राहुल गांधींना तणावग्रस्त मंदसौर जिल्ह्यात प्रवेशबंदी केली आहे. मात्र तरीही राहुल गांधी यांनी मंदसौरला जाण्याचा निर्णय घेतला होता. पोलिसांनी राजस्थान सीमेवरच राहुल गांधींना अडवलं होतं. यानंतर राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकार मी मंदसौर येथील मृत शेतक-यांच्या कुटुंबियांची भेट घेऊ नये यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता.
राहुल गांधी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी घटनास्थळी जात होते. पण पोलिसांनी घटनास्थळी जाण्यापासून रोखल्याने राहुल गांधी आमदार जीतू पटवारी यांच्या बाईकवर बसून निघून गेले. त्यांच्यासोबत कमलनाथ, सचिन पायलही बाईकवरुन मध्य प्रदेशकडे रवाना झाले. मध्य प्रदेश पोलिसांना चकवा देत, त्यांनी अखेरच्या क्षण प्लॅन बदलून, कारमधून उतरुन बाईकने छोट्या रस्त्याने निघून गेले होते. मात्र पोलिसांनी त्यांना अडवून अटक केलं. सध्या त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली असून मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.
प्रिय बहनों,भाइयों नमस्कार! मेरी सरकार किसानों की सरकार है। जनता की सरकार है। मेरी जब तक साँस चलेगी,जनता और किसानों के लिए काम करता रहूँगा। pic.twitter.com/iICe0mNnmw— ShivrajSingh Chouhan (@ChouhanShivraj) June 8, 2017
पोलिसांनी मात्र ना आम्ही गोळी चालवली, ना चालवण्याचा आदेश दिला अशी माहिती दिल्याचं स्वतंत्र सिंह यांनी सांगितलं आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या पोस्टमॉर्टमचा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण समजू शकेल.
दरम्यान, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंदसौरचे जिल्हाधिकारी स्वतंत्र सिंह आणि पोलिस अधीक्षक ओपी त्रिपाठी यांची बदली केली आहे. स्वतंत्र कुमार सिंह यांची बदली मंत्रालयात उपसचिवपदी केली आहे. तर सिंह यांच्या जागी ओपी श्रीवास्तव यांची जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. तसंच सरकारने मंदसौरचे पोलिस अधीक्षक ओपी त्रिपाठी यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मनोज कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.