उत्तर प्रदेश - भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी अमेठीत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी गुजरातमध्ये जाऊन मोदींविरोधात गरळ ओकत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींना घेरण्यासाठी भाजपा नेत्यांनी कंबर कसली आहे.भाजपा नेत्यांनी अमेठीत एक रॅलीचं आयोजन केलं असून, भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव मौर्य, उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे यांनी या रॅलीत सहभाग घेतला आहे. योगी आदित्यनाथ म्हणाले, जगभरात नरेंद्र मोदींमुळे भारताला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला सर्वात पहिल्यांदा समर्थन दिलेल्या अर्थशास्त्रज्ञालाच नोबेल पुरस्कार मिळाला आहे.शेतक-यांना त्यांच्या पिकांची योग्य किंमत मिळत नाही. भाजपा उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत आल्यानंतर 37 लाख मेट्रिक टन गहू शेतक-यांकडून खरेदी करण्यात आला आहे. धान्य खरेदीच्या प्रणालीचीही व्यवस्था करण्यात आली. आम्ही दलालांना बाजूला सारलं आहे. त्यामुळे काँग्रेस बेरोजगार झाले आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनं या प्रथेला सुरुवात केली होती. अमेठी व रायबरेलीचा काँग्रेसनं कधीच विकास केला नाही. मात्र भाजपाचा या जागांवर पराभव झाला असला तरी भाजपानं या क्षेत्राचा विकास केला. रॅलीमध्ये स्मृती इराणी यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.साडेतीन वर्षांपूर्वी मी अमेठीत आले, त्यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी माझं स्वागत केलं. मी पक्षाची एक कार्यकर्ती म्हणून आले व आज लोकांसाठी दीदी बनली आहे, हे माझं सौभाग्य आहे, असं स्मृती इराणी म्हणाल्या आहेत. यावेळी भाजपाध्यक्ष अमित शाह यांनीही सरळ सरळ राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे. जनता राहुल गांधींकडे तीन पिढ्यांचा हिशेब मागतेय, उत्तर प्रदेशही गुजरातप्रमाणे विकसित राज्य बनेल, यूपीत योगी, केंद्रात मोदी एकत्र विकास करतील, गुजरातचा विकास हा गुजरातच्या जनतेला माहीत आहे, अमेठीला पाहिल्यास राहुल गांधींनी काय विकास केला ते दिसेल, असं म्हणत अमित शाह यांनी राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे.
जनता राहुल गांधींकडे तीन पिढ्यांचा हिशेब मागतेय, अमेठीत टीम शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 1:54 PM