पाटणा : गलवानमध्ये चिनी सैनिकांबरोबर झालेल्या संघर्षात बिहारमधील जवानही शहीद झाले; पण त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके काय करीत होते असा भेदक सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी या राज्यातील हिसुआ येथे शुक्रवारी पहिली प्रचारसभा घेतली. गलवान येथे चिनी सैनिकांबरोबरील संघर्षात बिहारमधील काही लष्करी जवानही शहीद झाले होते. अशा शूर व्यक्तींना सैन्यात पाठविणाऱ्या बिहारच्या लोकांना मोदी यांनी शुक्रवारी घेतलेल्या प्रचारसभेत अभिवादन केले. त्या अनुषंगाने राहुल गांधी म्हणाले की, चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. मात्र, ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी का नाकारली, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. २ कोटी लोकांना नोकऱ्या देऊ असे आश्वासन मोदी यांनी गेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी दिले होते.
कोरोना साथीच्या काळात अनेक बिहारी मजूर शेकडो मैल चालत आपल्या राज्यात परतले. मोदी फक्त अदानी व अंबानी यांच्यासाठीच काम करतात, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
नोकऱ्यांचे आश्वासन फसवेबिहारमधील लोकांना १९ लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. प्रत्येकाच्या बँक खात्यात सरकार १५ लाख रुपये जमा करण्याच्या मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनासारखेच हेही फसवे आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.