प्रज्ञासिंह ठाकूरांच्या संदर्भात केलेल्या 'त्या' विधानावर राहुल गांधी ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 04:49 PM2019-11-29T16:49:18+5:302019-11-29T16:56:20+5:30
नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्या प्रज्ञासिंह ठाकूरांनी यू-टर्न घेत माफीनामा दिला.
नवी दिल्लीः नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्या प्रज्ञासिंह ठाकूरांनी यू-टर्न घेत माफीनामा दिला. प्रज्ञासिंह ठाकूरांच्या माफीनाम्यानंतर संसदेत गदारोळ सुरूच होता. प्रज्ञासिंह ठाकूरांनी माफी मागितल्यानंतर भाजपानं राहुल गांधींनाही घेरण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधींनी प्रज्ञासिंह ठाकूरांना दहशतवादी म्हटलं होतं. त्यानंतर प्रज्ञासिंह ठाकूरांनी राहुल गांधींच्या विरोधात विशेषाधिकाराचं उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस दिली आहे. परंतु राहुल गांधी प्रज्ञासिंह ठाकूरांसंदर्भात केलेल्या विधानावर अद्यापही ठाम आहेत. मी माझ्या विधानावर ठाम असून, मागे हटणार नसल्याचं राहुल गांधींनी स्पष्ट केलं आहे.
तत्पूर्वी माझ्या विधानानं जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी माफी मागते, असंही प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या होत्या. संसदेतील एका सदस्यानं मला दहशतवादी म्हटलं होतं. हा माझ्या प्रतिष्ठेवर हल्ला आहे. न्यायालयात माझ्याविरोधात अजूनही आरोप सिद्ध झालेले नाहीत, असंही त्या राहुल गांधींना उद्देशून म्हणाल्या आहेत. त्यानंतर राहुल गांधी आपलं विधान मागे घेतील, अशी अपेक्षा होती, परंतु राहुल गांधी अजूनही आपल्या विधानावर ठाम आहेत.
आमची फक्त एकच मागणी आहे, कोणत्याही अटीशिवाय प्रज्ञासिंह ठाकूरांनी माफी मागायला हवी, अशी मागणी काँग्रेस नेते अधीर रंजन यांनी केली आहे. दुसरीकडे भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्रात काँग्रेसनं शिवसेनेबरोबर जात केलेल्या सत्ता स्थापनेवर टीका केली आहे. काँग्रेसनं शिवसेनेबरोबर सरकार स्थापन केलेलं आहे. शिवसेनेनंही सामनामधून नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं आहे. काँग्रेस सत्तेसाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत लाचार होऊ शकते, असं निशिकांत दुबे म्हणाले आहेत.#WATCH Delhi: Congress MP Rahul Gandhi reacts to BJP MP Nishikant Dubey demanding to bring privilege motion against him for calling BJP MP Pragya Singh Thakur, a 'terrorist'. He says, "Do it. Do whatever you want to. I have clarified my position." pic.twitter.com/iNZiQk7ULl
— ANI (@ANI) November 29, 2019