लडाख सीमेवरची स्थिती सगळ्यांनाच माहित्येय, राहुल गांधींचा 'शाह'जोग टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 04:27 PM2020-06-08T16:27:48+5:302020-06-08T16:30:04+5:30
सीमा सुरक्षासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक विधान केलं होतं. त्या विधानाचा हवाला देत राहुल गांधींनी त्यांचा मुद्दा खोडून काढला आहे.
नवी दिल्लीः लडाखजवळ चीन अन् भारत आमनेसामने आल्यानं परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शाहांना हल्लाबोल केला आहे. सीमा सुरक्षासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक विधान केलं होतं. त्या विधानाचा हवाला देत राहुल गांधींनी त्यांचा मुद्दा खोडून काढला आहे. राहुल गांधींनी ट्विटरवर लिहिले आहे की, प्रत्येकास सीमेचे वास्तव माहीत आहे, पण तुमच्या मनाच्या आनंदासाठी ‘शाह-यद’ हा विचार चांगला आहे.
बिहारमध्ये एका रॅलीला संबोधित करताना अमित शाह म्हणाले होते की, भारताच्या संरक्षण धोरणाला जागतिक मान्यता मिळाली आहे. अमेरिका आणि इस्त्राईलनंतर संपूर्ण जग सहमत आहे की इतर कोणताही देश आपल्या सीमेचे रक्षण करण्यास सक्षम असेल तर तो भारत आहे. गृहमंत्री अमित शहा यांचे हे विधान ट्विटरवर शेअर करताना राहुल गांधी यांनी कविता लिहिली. त्या कवितेतून त्यांनी अमित शाहांचा खरपूस समाचार घेतला आहे.
पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनदरम्यान सीमा विवाद सुरू आहे. सीमेवर दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने आलेले आहेत आणि दोन्ही बाजूंकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक बैठकांच्या फे-या झाल्या. पण अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. भारत आणि चीन यांच्या सीमेवरील वादासंदर्भात गेल्या आठवड्यात राहुल गांधींनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते. अलीकडेच त्यांनी असा प्रश्न केला होता की, कोणतेही चिनी सैनिक भारतीय हद्दीत शिरले नाहीत, याची खात्री सरकार करू शकेल का?
सब को मालूम है ‘सीमा’ की हक़ीक़त लेकिन,
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 8, 2020
दिल के ख़ुश रखने को, ‘शाह-यद’ ये ख़्याल अच्छा है।https://t.co/cxo9mgQx5K
चिनी सैन्य युद्धाच्या तयारीत व्यस्त
भारत-चीन सीमा विवाद सोडविण्यासाठी दोन्ही देशांनी मुत्सद्दीपणाचा आणि वाटाघाटीचा मार्ग निवडला असला तरी चिनी सैन्य सतत युद्धाच्या तयारीत व्यस्त आहे. तिबेट सीमेवर युद्धाचा सराव केल्यानंतर आता चिनी सैन्याने देखील चीनच्या वायव्य भागात डोंगरावर लढा देण्यासाठी युद्ध सराव केला आहे. चीनची अधिकृत मीडिया सातत्याने चिनी सैनिकी युद्धाचे व्हिडिओ शेअर करीत आहे.