नवी दिल्ली, दि. 6 - गौरी लंकेश या पत्रकाराती बेंगळूरमध्ये झालेली हत्या दुर्दैवी असून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी थेट पंतप्रधानांना लक्ष्य केले आहे. विरोधी विचारसरणीला बळाने दाबून टाकण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप राहूल यांनी केला आहे. लंकेश यांची हत्या संघाशी संबंधित लोकांनी केली असल्याचे सूचक उद्गार काढत राहूल गांधी यांनी नरेंद्र मोदी हिंदुत्ववादी विचारांचे पंतप्रधान असल्याचा उल्लेख केला.तसेच, नरेंद्र मोदी जेव्हा बोलतात तेव्हा त्याचे दोन अर्थ निघतात. एक अर्थ त्यांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी असतो तर एक अर्थ तमाम दुनियेसाठी असतो असे सांगत मोदी हिंदुत्ववादी विचारांना बळ देत असल्याची टीका गांधी यांनी केली आहे.विरोधी विचारांचे आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न होत असल्याचे गांधी म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख करत राहूल गांधी यांनी लंकेश यांची हत्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या समाजकंटकांनी केली असावी असे सुचवले आहे. आपण कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी बोललो असून, लंकेश यांची हत्या करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, त्यांना पकडण्यात येईल असे गांधी म्हणाले. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे.
काल मंगळवारी राहत्या घरी झाली लंकेश यांची हत्या
देशातील आघाडीच्या पत्रकारांपैकी एक असलेल्या गौरी लंकेश यांची बंगळुरूमधील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. रात्री आठ सव्वाआठच्या सुमारास तीन ते चार हल्लेखोरांनी गौरी यांच्या घरात घुसले आणि त्यांनी जवळून गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्यांच्यावर हा हल्ला का करण्यात आला. तसेच त्यांच्यावर हल्ला करणारे कोण होते. याबाबत काहीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. 55 वर्षीय गौरी लंकेश या साप्ताहिक लंकेश पत्रिकाच्या संपादक होत्या. तसेच त्या विविध वर्तमानपत्रांमध्ये लिखाण करायच्या. त्यांनी उजव्या विचारसरणीच्या प्रवृत्तीवर सातत्याने टीका केली होती.