काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बिहारमधील सीमांचलमध्ये पोहोचली आहे. पूर्णियामध्ये राहुल गांधींचा देसी अंदाज पाहायला मिळाला. डोक्याला टॉवेल बांधून खाटेवर बसल्यानंतर राहुल यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. राहुल गांधी यांनी पूर्णियातील शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांसाठी मोदी सरकारला जबाबदार धरलं.
शेतकऱ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले, "शेतकऱ्यांना चारही बाजूंनी घेरलं जात आहे. तुमची जमीन हिसकावून घेतली जात आहे. तुमच्याकडून जमीन हिसकावून अदानीसारख्या मोठ्या उद्योगपतींना भेट म्हणून दिली जाते. खतं, बियाणांचा प्रश्न आला की तुमच्यावर दबाव आणला जातो आणि तुमचा पैसा हिसकावला जातो."
"पंतप्रधान मोदींनी सर्वात मोठं काम करण्याचा प्रयत्न केला - त्यांनी तीन काळे कायदे आणले आणि जे तुमचे होते ते तुमच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. देशातील तमाम शेतकरी त्या विरोधात उभा राहिला, मागे हटला नाही. शेतकरी हा देशाचा कणा आहे असं मला वाटतं. अब्जाधीशांचे 14 लाख कोटी रुपये माफ झाले आहेत मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालं नाही. "
सीमांचलमध्ये आपला बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी काँग्रेस आज पूर्णिया येथील रंगभूमी मैदानावर एक मोठी रॅली काढणार आहे. सीमांचल हे बिहारमधील मुस्लिमबहुल क्षेत्र असून पूर्णिया, अररिया, कटिहार, किशनगंज हे चार जिल्हे पूर्णिया आयुक्तालयाच्या अंतर्गत आहेत.
काँग्रेस नेत्याच्या म्हणण्यानुसार, पूर्णिया रॅलीसाठी नितीश कुमार यांनाही आमंत्रित करण्यात आले होते, परंतु आता त्यांनी इंडिया आघाडीशी संबंध तोडून एनडीएमध्ये प्रवेश केला आहे. 2020 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच बिहारच्या दौऱ्यावर येत आहेत.