राहुल गांधींची अरुण जेटलींवर 'ट्विट'टीका : नोटाबंदी-GSTमुळे अर्थव्यवस्था ICUमध्ये, तुमच्या औषधातही नाही जोर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 12:05 PM2017-10-26T12:05:02+5:302017-10-26T12:05:13+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नोटाबंदी आणि जीएसटीवरुन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नोटाबंदी आणि जीएसटीवरुन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर निशाणा साधला आहे. 'नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्था ICU मध्ये आहे आणि तुमच्या औषधातही काही जोर नाहीय', असे ट्विट राहुल गांधी यांनी गुरुवारी (26 ऑक्टोबर) सकाळी केले आहे. सलग तीन वर्ष भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात जलद गतीनं वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे, असं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बुधवारी म्हटले होते. यावर राहुल गांधी यांनी टीका केली आहे.
डॉ जेटली, नोटबंदी और GST से अर्थव्यवस्था ICU में है।
— Office of RG (@OfficeOfRG) October 26, 2017
आप कहते हैं आप किसी से कम नहीं,
मगर आपकी दवा में दम नहीं
मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला ९ लाख कोटींचे ‘टॉनिक’, आजारी बँकांना दोन लाख कोटींचे भांडवल
दरम्यान, पाया मजबूत असूनही प्रासंगिक कारणांमुळे आलेली मरगळ दूर होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला नव्याने झेप घेण्यासाठी उभारी मिळावी, यासाठी 9 लाख कोटी रुपयांच्या ‘टॉनिक’ची घोषणा केंद्र सरकारने मंगळवारी केली. यात बुडित व थकित कर्जांखाली दबलेल्या सरकारी बँकांना भांडवलपूर्तीसाठी 2 लाख 11 हजार कोटी देण्याचा व ‘सागरमाला’ या महत्त्वाकांक्षी योजनेसह अन्य महामार्ग व रस्ते बांधणीसाठी तब्बल सात लाख कोटी रुपये खर्च करण्याचा समावेश आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्या खात्याच्या वित्त, वित्तीय सेवा, महसूल या तिन्ही विभागांचे सचिव आणि मुख्य आर्थिक सल्लागारांना सोबत घेऊन, देशाची अर्थव्यवस्थेला ठराविक क्षेत्रांत थोडासा टेकू दिला, तर ती पुन्हा जलद विकासाच्या दिशेने धाव घेण्यास सक्षम आहे, असा दावा केला. दरम्यान, या घोषणांचा निवडणुकांशी काहीही घेणं-देणं नाही,असेही अरुण जेटली यांनी यावेळी सांगितले. ज्यांनी देश उद्ध्वस्त केलाय, आता ते प्रवचनच देणार असे सांगत जेटलींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे.
राहुल गांधींना प्रतिटोला
सोमवारी गुजरातमधील सभेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘जीएसटी’ म्हणजे, ‘गब्बर सिंग टॅक्स’ असे म्हणून टीका केली. त्याविषयी विचारता जेटली यांनी असा प्रतिटोला हाणला की, ज्या लोकांना 2-जी आणि कोळसा खाणवाटप घोटाळ्यांची सवय झाली आहे, त्यांचा उजळ माथ्याने रास्त कर भरण्यास आक्षेप असणे स्वाभाविकच आहे!