नवी दिल्ली-
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवायांवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. श्रीनगरमधील एका शाळेत आज दहशतवादी घुसले आणि अंदाधुंद गोळीबार करत दोन शिक्षकांवर गोळ्या झाडल्या. श्रीनगरमध्ये या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून मन सुन्न करणाऱ्या घटनेनं सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत. राहुल गांधींनीही या घटनेची दखल घेतली आहे. जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांबाबत राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे.
"काश्मीरमधील हिंसक घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दहशतवाद ना नोटबंदी केल्यानं थांबना, ना कलम ३७० रद्द केल्यानं. केंद्र सरकार सुरक्षा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. काश्मीरी बंधू-भगिनींवर होणाऱ्या भ्याड हल्ल्यांचा मी निषेध व्यक्त करतो आणि मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो", असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
श्रीनगरमध्ये शाळेत घुसून शिक्षकांवर गोळीबार श्रीनगरच्या संगाम ईदगाह परिसरातील एका शाळेत घुसून शिक्षकांवर गोळीबार केला आहे. यात दोन शिक्षकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाची परिस्थिती आहे. श्रीनगर पोलीस घटनास्थळावर पोहोचले असून शोधमोहिमेला सुरुवात झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या दोघांमध्ये एक शाळेचे मुख्याध्यापक असून त्यांचं नाव सतिंदर कौर असं आहे. तर दीपक चंद नावाच्या शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. दोघंही अल्लोचोईबाग येथील रहिवासी आहेत. शाळेत घुसून थेट अंदाधुंद गोळीबार करण्यास दहशतवाद्यांनी सुरुवात केली होती.