भारत जोडो न्याय यात्रा सुरू करण्यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी देशातील तरुणांना संबोधित केलं आहे. यावेळी त्यांनी देशाच्या तरुणांनो! आज राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आपण स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे पुन्हा स्मरण केलं पाहिजे. तरुणांची ऊर्जा हा समृद्ध देशाचा आधार आहे आणि पीडित आणि गरीबांची सेवा ही सर्वात मोठी तपश्चर्या असल्याचं म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी "तरुणांना विचार करावा लागेल की आपल्या स्वप्नांच्या भारताची ओळख नेमकी काय असेल? जीवनाची गुणवत्ता की फक्त भावनिकता? प्रक्षोभक घोषणा देणारे तरुण की नोकरदार तरुण? प्रेम की द्वेष? आज खर्या मुद्द्यांवरून लक्ष हटवून भावनिक मुद्द्यांचा राजकीय दुरुपयोग केला जात आहे, हा देशातील जनतेचा विश्वासघात आहे."
"वाढती बेरोजगारी आणि महागाईत तरुण आणि गरीब लोक शिक्षण, कमाई आणि औषधांच्या ओझ्याखाली दबले जात असून सरकार त्याला ‘अमृत काळ’ म्हणत आनंदोत्सव साजरा करत आहे. सत्तेच्या अहंकारात असलेला सम्राट वास्तवापासून दूर गेला आहे" असं म्हटलं आहे.
"सत्याचा विजय होईल, न्याय होईल"
"अन्यायाच्या या वादळात न्यायाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी, स्वामी विवेकानंदजींच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन, न्याय हक्क मिळेपर्यंत करोडो तरुण न्याय योद्धे माझ्या या संघर्षात सामील होत आहेत. सत्याचा विजय होईल, न्याय होईल" असं देखील म्हटलं आहे. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारीपासून मणिपूरमधून सुरू होणार आहे.