नवी दिल्ली: राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरुन पुन्हा एकदा देशातील राजकारण ढवळून निघालं आहे. फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्या विधानामुळे फ्रान्ससह भारतातही खळबळ माजली आहे. फ्रान्सचे माजी अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हणाले. त्यामुळे आता तरी मोदींनी मौन सोडावं आणि देशाला सत्य सांगावं, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी थेट पंतप्रधानांना लक्ष्य केलं. यानंतर भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींवर पलटवार केला. राहुल गांधी यांचं घराणंचं भ्रष्टाचाराची जननी असल्याची टीका भाजपाकडून करण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी काल पत्रकार परिषद घेतली. मोदी सरकारकडून राफेल करारासाठी केवळ अनिल अंबानींच्या रिलायन्सचं नाव सुचवण्यात आल्यानं फ्रान्सच्या डॅसो एव्हिऐशन कंपनीकडे इतर कोणताही पर्याय नव्हता, असं विधान फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी केलं होतं. यावरुन राहुल गांधींनी मोदींवर टीकेची झोड उठवली. 'मोदींनी अनिल अंबानींच्या फायद्यासाठी मागच्या दारानं करारात बदल केले. मोदी आणि अंबानी यांच्यात काय डील झालं हे देशाला कळायला हवं. मोदी आणि अंबानी यांनी देशाच्या संरक्षण दलांवर 1 लाख 30 हजार कोटी रुपयांचा सर्जिकल स्ट्राईक केला आहे,' असा घणाघात राहुल यांनी केला. फ्रान्सचे माजी अध्यक्ष मोदींना चोर म्हणाले, अशा तिखट शब्दांमध्ये राहुल यांनी मोदींना लक्ष्य केलं. यानंतर ट्विटरवर #MeraPMChorHai ट्रेंडमध्ये आला.
Rafale Deal: काँग्रेस-भाजपामध्ये सोशल मीडियावर जुंपली; #MeraPMChorHai ट्रेंडमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 8:18 AM