नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या ही जवळपास सात लाखांपर्यंत पोहोचली आहे. देशात गेल्या 24 तासांत तब्बल 24,248 नवे रुग्ण आढळून आले असून 425 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,97,413 वर गेली आहे. रुग्णसंख्येने रेकॉर्ड मोडला आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोना व्हायरसवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून पंतप्रधानांवर हल्लाबोल केला आहे. राहुल यांनी नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. भविष्यात हॉवर्डमध्ये जेव्हा अपयशावर अभ्यास केला जाईल तेव्हा कोविड, नोटबंदी आणि जीएसटी या तीन गोष्टींचा उल्लेख असेल असं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी मोदींना टोला लगावला आहे. "हॉवर्डच्या बिजनेस स्कूलमध्ये भविष्यात अपयशाच्या केस स्टडी म्हणून कोविड, नोटबंदी आणि जीएसटी या तीन गोष्टी शिकवल्या जातील" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करताना नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. कोरोना व्हायरसविरोधातील लढाई 21 दिवसांमध्ये जिंकू असं या व्हिडीओ नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीही राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला होता. केंद्राकडे कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी कोणतीही योजना नाही असा आरोप राहुल गांधींनी केला होता. "कोरोना व्हायरस देशाच्या नव्या भागांत अत्यंत वेगाने पसरत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी, त्याविरोधात लढण्यासाठी मोदी सरकारकडे कोणतीही योजना नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत बसले आहेत. त्यांनी या रोगापुढे आणि त्याच्या वाढत्या प्रादुर्भावापुढे सरेंडर केलं आहे" असाही आरोप राहुल गांधी यांनी केला होता.
गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी कोरोना व्हायरस, भारत-चीन संघर्ष यावरून जोरदार हल्लाबोल करत आहेत. याआधीही इंधन दरवाढीचा भडका आणि कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने होत असलेली वाढ यावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. "मोदी सरकारने कोरोना महामारी व पेट्रोल-डिझेलच्या किमती अनलॉक केल्या आहेत" अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. तसेच या सोबत एक ग्राफही शेअर केला आहे. यामध्ये कशी वाढ झाली हे दाखवण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
भाजपाच्या 'या' नेत्याला मिळणार प्रियंका गांधींचा बंगला; 'हे' आहे कारण
CoronaVirus News : परीक्षा पडली महागात; तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
संतापजनक! मास्क न लावण्यावरून झाला वाद, भाजप नेत्याची पोलिसांना मारहाण