नवी दिल्ली: राफेल डीलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट हस्तक्षेप केला. अनिल अंबानींच्या कंपनीला राफेलचं कंत्राट मिळावं म्हणून त्यांनी समांतर वाटाघाटी केल्या, असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान मोदींनी थेट फ्रान्सशी वाटाघाटी केल्यानं संरक्षण मंत्रालयाची बाजू कमजोर ठरली, असं वृत्त आज 'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलं. याबद्दल संरक्षण मंत्रालयानं तीव्र नाराजी व्यक्त केल्याचंही वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. त्याचाच आधार घेत राहुल यांनी मोदींवर थेट हल्लाबोल केला. राफेल डीलसाठी संरक्षण मंत्रालयाची फ्रान्स सरकारसोबत बोलणी सुरू होती. मात्र त्यात पंतप्रधान कार्यालयानं हस्तक्षेप केला. याचा फायदा फ्रान्सला झाला. पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आलेल्या हस्तक्षेपाचा आणि समांतर वाटाघाटींचा संरक्षण मंत्रालयानं निषेधही नोंदवला होता, असं वृत्त 'द हिंदू'नं आज प्रसिद्ध केलं. या वृत्ताच्या आधारे राहुल यांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान अनिल अंबानींसाठी काम करतात. मोदींच्या हस्तक्षेपाचा प्रतिकूल परिणाम संरक्षण मंत्रालयाकडून सुरू असलेल्या बोलणीवर आणि वाटाघाटींवर झाला, असा स्पष्ट आरोप राहुल यांनी केला. फ्रान्सचे माजी पंतप्रधान ओलांद यांनी मोदींना चोर म्हटलं आणि आता संरक्षण मंत्रालय मोदींना चोर म्हणतंय, अशा शब्दांमध्ये राहुल मोदींवर बरसले.काँग्रेस भारतीय हवाई दलाला कमजोर करण्याचं काम करत असल्याचा गंभीर आरोप काल पंतप्रधान मोदींनी संसदेत केला होता. त्यालाही राहुल यांनी उत्तर दिलं. संरक्षण मंत्रालयानं पंतप्रधान कार्यालयाच्या हस्तक्षेपाचा निषेध केला आहे. त्यात काँग्रेसचा संबंध येतोच कुठे?, असा प्रतिप्रश्न राहुल यांनी केला. मोदींनी भारतीय हवाई दलाचे 30 हजार कोटी रुपये उचलून अंबानींना दिले. यामुळे हवाई दलाचं नुकसान झालं. मोदींनी हिंदुस्तान ऍरॉनिटिक्स लिमिटेडऐवजी अनिल अंबानींच्या कंपनीला राफेलचं कंत्राट मिळवून दिलं, याचा पुनरुच्चार राहुल यांनी केला.