...तर देशातील ११ कोटी कुटुंबांना २० हजार रुपये मिळाले असते : राहुल गांधींचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 12:33 PM2020-12-31T12:33:10+5:302020-12-31T12:41:46+5:30
उद्योगपतींच्या कर्ज माफ करण्यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तिखट टीका केली आहे. एक ट्विट करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
नवी दिल्ली : उद्योगपतींच्या कर्ज माफ करण्यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तिखट टीका केली आहे. गुरुवारी एक ट्विट करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
मोदी सरकारने या वर्षी 2378760000000 इतके कर्ज काही उद्योगपतींचे माफ केले आहे. कोरोना संकटाच्या कालावधीत याच पैशांचा वापर करून देशातील ११ कोटी कुटुंबांना २०-२० हजार रुपये देता आले असते. मोदीजींच्या विकासाचा हाच खरा चेहरा आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. उद्योगपतींचे कर्ज माफ केलेल्या रकमेतून देशातील कोट्यवधी कुटुंबीयांचे भले करता आले असते, असा दावाही त्यांनी या माध्यमातून केला आहे. सामान्य जनतेला मदत करण्याऐवजी मोदी सरकारने देशातील उद्योगपतींचे कर्ज माफ केल्याचा अप्रत्यक्ष टोला राहुल गांधी यांनी या ट्विटमधून लगावला आहे.
2378760000000
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 31, 2020
रुपय का क़र्ज़ इस साल मोदी सरकार ने कुछ उद्योगपतियों का माफ़ किया।
इस राशि से कोविड के मुश्किल समय में 11 करोड़ परिवारों को 20-20 हज़ार रुपय दिए जा सकते थे।
मोदी जी के विकास की असलियत!
दरम्यान, केंद्रीय कृषी कायदा, कोरोना व्यवस्थापन यांसारख्या काही मुद्द्यांवरून राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील बैठकीपूर्वीही राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. मोदी सरकारची आश्वासने पोकळ आणि फसवी आहेत, असा आरोपही राहुल गांधींनी केला होता. मोदींचे हे असत्याचे प्रयोग आहेत. त्यावर देशातील शेतकरी कदापिही विश्वास ठेवणार नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.