नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. काही गुंडांनी मुलीसमोरच एका पत्रकारावर गोळ्या घालून हत्येचा प्रयत्न केल्याचा भयंकर प्रकार समोर आला होता. विक्रम जोशी असं या पत्रकाराचं नाव असून मुलीसोबत घरी जात असताना गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला. ही धक्कादायक घटना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. मात्र या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर उत्तर प्रदेशातील राजकारण तापलं आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विक्रम जोशी यांच्या मृत्यूनंतर सरकारवर निशाणा साधला आहे. "वचन होतं राम राज्याचं, दिलं गुंडाराज" असं म्हणत राहुल यांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. "आपल्या भाचीसोबत होत असलेल्या छेडछेडीला विरोध केला म्हणून पत्रकार विक्रम जोशी यांची हत्या करण्यात आली. माझ्या सहवेदना शोकाकूल परिवारासोबत आहेत. वचन राम राज्याचं दिलं होतं, दिलं गुंडाराज" असं ट्विट त्यांनी केलं आहे.
आपल्या ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. गाझियाबादच्या विजयनगर भागातून विक्रम जोशी आपल्या बाईकवरून मुलीसोबत प्रवास करत होते. यावेळी काही गुंडांनी मागून येऊन त्यांना घेरलं. तसेच जोशी यांना बेदम मारहाण करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पसार झाले. हा सगळा प्रकार जोशी यांच्या मुलीच्या डोळ्यांदेखत घडला असून या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी जोशी यांनी आपल्या भाचीसोबत झालेल्या छेडछाडीची पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यामुळेच हा हल्ला झाला असावा असा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
विक्रम जोशी यांचा भाऊ अनिकेत जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत यांच्या मुलीसोबत काही दिवसांपूर्वी छेडछाडीची घटना घडली होती. त्यांचा विरोध विक्रम जोशी यांनी करत यासंबंधी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यामुळेच सोमवारी सायंकाळी विक्रम यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा संशय अनिकेत यांनी व्यक्त केला आहे. जखमी अवस्थेत असलेल्या जोशींवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
कौतुकास्पद! कोरोनावर मात केल्यानंतर चक्क उद्योगपतीने ऑफिसला बनवलं रुग्णालय, मोफत देतोय उपचार
कोरोनाचा फटका! नोकऱ्यांबाबत अपडेट देणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
CoronaVirus News : हवेतूनही होतो कोरोनाचा प्रसार; मास्कबाबत तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले...
पावसाचे थैमान! आठ राज्यांत तब्बल 470 जणांचा मृत्यू
...म्हणून दर 6 महिन्यांनी होणार आता सिमकार्ड व्हेरिफिकेशन, जाणून घ्या नवा नियम