नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रे दरम्यान देशभरातील अनेक लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी सर्वसामान्यांसोबत चहा-पाणी, जेवण, गप्पागोष्टीही केल्या. त्यामुळे, त्यांच्या साधेपणाची सर्वत्र चर्चा झाली. आज पुन्हा एकदा राहुल गांधींचा साधेपणा चर्चेत आला आहे. राजधानी दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकावर हमालांची भेट घेतली आहे. त्यावेळी त्यांनी काही प्रवाशांचे सामानही उचलले. ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे. राहुल गांधीच्या या नवीन वेशातील फोटोवर आता भाजपाने टीका केलीय.
काँग्रेस पक्षाने राहुल गांधी आणि हमाल यांच्या भेटीचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. सध्या या भेटीची जोरदार चर्चा होत आहे. फोटो शेअर करताना काँग्रेस पक्षाने "लोकनेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्टेशनवर हमाल सहकाऱ्यांना भेटले. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये रेल्वे स्टेशनच्या हमाल सहकाऱ्यांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. आज राहुलजी त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी त्यांचं म्हणणं ऐकलं. भारत जोडो यात्रा सुरूच आहे.", असे काँग्रेसने म्हटले आहे. मात्र, या फोटोवरुन आता भाजपने राहुल गांधींवर टीका केलीय.
राहुल गांधींसारखा मुका माणूसच चाके असलेली सुटकेस डोक्यावर घेऊन जाईल, असे म्हणत भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेस व राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. तसेच, ही सगळी नाटकं असल्याचंही त्यांनी म्हटलय. राहुल गांधी आत्तापर्यंत हमालांसाठी रेल्वे स्टेशनवर गेले नव्हते. सध्या अनेकांकडे प्रवाशांच्या आणि पोर्टर्सच्या सोयीसाठी एस्केलेटर किंवा रॅम्प आहेत, तरीही ते तिथं जाऊन नाटक करतात, असा टोलाही अमित मालविय यांनी राहुल गांधींना लगावलाय.
दरम्यान, राहुल गांधी भारत जोडो यात्रेपासून सातत्याने लोकांना भेटत आहेत. यापूर्वी त्यांनी हरियाणात ट्रॅक्टर चालवून शेतकऱ्यांसोबत शेतात काम केलं होतं. यानंतर त्यांनी मोटार मेकॅनिकचीही भेट घेतली. राहुल गांधी दिल्लीतील करोलबागमध्ये मोटरसायकल मेकॅनिकशी बोलताना दिसले. या अगोदर भारत जोडो यात्रेत त्यांनी ट्रक ड्रायव्हरशीही संवाद साधला होता. त्यावेळी, काही अंतर ट्रकमधून प्रवास केला होता.