ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पुढील आठवड्यात युरोपच्या सुट्टीवरून परत आल्यानंतर काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुका पार पडणार असून त्यावेळीच राहुल यांच्याकडे 'पक्षाध्यक्ष'पदाची सूत्रे सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. आपण सुट्टीसाठी युरोपला जात असल्याचे ट्विट राहुल गांधी यांनी डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात केले होते. आपल्या विदेश दौ-याबाबत त्यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक स्तरावर माहिती दिली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जानेवारीनंतर काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यासाठी राहुल लवकर परतणार असून ते आल्यानंतरच पक्षांतर्गत निवडणुकीच्या प्रक्रियेलाही वेग येईल.
पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास राहुल गांधी तयार असून त्यांना अध्यक्षपद स्वीकारायचे नाहीये, असे म्हणणे चुकीचे असल्याचे पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे. आसाम निवडमुकीनंतरच राहुल गांधी पक्षाची सूत्रे स्वीकारतील अशी चर्चा सध्या सुरू असली तरी त्यात काहीही तथ्य नाही, त्या निवडणुकीपूर्वीच त्यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली
राहुल यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात यावीत असा सूर काँग्रेसमधील नेते आळवत असून तळागाळातील कार्यकर्त्यांचीही तीच इच्छा आहे, मात्र याबाबतचा अंतिम निर्णय सर्वस्वी सोनिया गांधी यांच्या हाती आहे, असे स्पष्ट करत नेत्यांनी हा कालावधी कोणता याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला.