वॉशिंग्टन, दि. 12 - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अमेरिकेच्या दौ-यावर आहेत. मंगळवारी त्यांनी बर्कले युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी भारताच्या ताकदीबाबत तेथील विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. तसंच देशाच्या विकासासंदर्भात त्यांचे स्वतःचं असलेले व्हिजन विद्यार्थ्यांपुढे मांडले. हे सर्व काही सांगत असताना त्यांनी देशातील आताचे केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लादेखील चढवला. शिवाय, 2012मध्ये काँग्रेस पक्षात अहंकार निर्माण झाल्यानं 2014 मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला, याची कबुलीही त्यांनी यावेळी दिली. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या भाषणातील 10 मुद्दे
1. हिंसेमुळे कुणाचंही भलं होणार नाही
राहुल गांधी यांनी हिंसेच्या राजकारण जोरदार हल्लाबोल केला आहे. भारत वर्षानुवर्षे अहिंसेच्या मार्गावर चालत आला आहे आणि पुढेही याच मार्गावरुन चालत राहणार.हिंसेमुळे मी माझ्या वडील, आजीला गमावलं आहे. मला माहिली आहे की हिंसेमुळे काय नुकसान होते. कोणत्याही व्यक्तीविरोधात हिंसा होऊ नये. जेव्हा तुम्ही जवळच्या माणसांना गमावता, तेव्हा तुम्हाला खोल जखमा होतात. हिंसाचाराच्या घटना आता मुख्य प्रवाहाचा भाग झाल्या आहेत आणि हा प्रकार अतिशय भयंकर आहे. अहिंसेच्या विचारांवरच हल्ले सुरू आहेत. अहिंसेमुळेच मानवता जिवंत राहू शकते. मात्र त्याच विचारधारेला लक्ष्य केले जात आहे.
2. नोटाबंदीसंदर्भात संसदेचा सल्ला घेतला नाही
नोटाबंदी निर्णयावरुन राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा निशाणा साधला. संसद व मुख्य आर्थिक सल्लागारांना विचारात न घेता अंमलात आणलेल्या नोटाबंदी व जीएसटीसारख्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम झाला आहे. यामुळे जीडीपीमध्ये घसरण झाल्याचेही राहुल गांधी यावेळी म्हणालेत
3. सत्तेत असताना अहंकार नसावा
कोणताही पक्ष सत्तेत आल्यानंतर त्यांच्यात अहंकार येता कामा नये. 2012मध्ये काँग्रेस पक्षामध्ये अहंकार निर्माण झाला होता आणि पक्षानं जनतेशी संवाद कमी केल्याने लोकं दुरावली. लोकांसोबतच संवाद कमी होत गेल्यानेच काँग्रेसला पराभव पत्करावा लागला, असे मतही राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केले.
4. मोदी सरकारनं RTI चे केले नुकसान
मोदी सरकारनं RTI च्या अधिकार कायद्याचंही प्रचंड नुकसान केले आहे. पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही हा कायदा बनवला होता.
5. रोजगाराची कमी
भारतात आजही रोजगाराचा प्रश्न कायम आहे. देशाला आता रोजगार निर्माण करायला हवा. मात्र आपण चीनच्या धोरणांनुसार रोजगारनिर्मिती करू शकत नाही. आपल्याला लोकशाहीनुसार हे कामं करावं लागणार.
6.BJPची लोकं माझ्याविरोधात अजेंडा चालवत आहेत - राहुल गांधी
राहुल गांधी यांनी यावेळी असेही म्हटले की, भाजपामधील काही जण केवळ कम्प्युटरसमोर बसून माझ्याविरोधात अजेंडा चालवत आहेत. मी मूर्ख आहे, मी असा आहे, मी तसा आहे, अशा पद्धतीनं माझ्याविरोधात ते अजेंडा राबवत आहेत.
7. सगळी पावर आहे पीएमओकडे
राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या काम करण्याच्या पद्धतीवर टीका करत म्हटले की, आता देशात काही मंत्र्यांमध्ये बोलणी होऊन कायदे बनवले जात आहेत, मात्र जर काँग्रेसची सत्ता आली तर जनतेशी संवाद साधून कायदे बनवू. आता देशाची संसद नाही तर केवळ पीएमओ मजबूत आहे, असे सांगत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
8. भाजपाचा होता कम्प्युटरला विरोध
जेव्हा भारतात राजीव गांधी यांनी कम्प्युटरसंदर्भात बोलणी करायचे तेव्हा त्याचा विरोध केला जायचा. भाजपाचे नेते जे नंतर भारताचे पंतप्रधान बनले, त्यांनीही कम्प्युटरला विरोध दर्शवला होता.
9. काश्मीरमुद्यावर भाष्य
काश्मीरमधील दहशतवाद आम्ही कमी केला, मात्र भाषणं नाही केलीत काश्मीर मुद्यावर राहुल गांधी यांनी म्हटले की, 9 वर्षे मी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम, जयराम नरेश यांच्यासोबत काश्मीर मुद्यावर काम केले. जेव्हा मी या कार्यासाठी सुरुवात केली तेव्हा काश्मीरमध्ये दहशतवाद मोठ्या प्रमाणात होता. 2013मध्ये मी मनमोहन सिंह यांची गळाभेट घेऊन म्हटले की काश्मीरमधील दहशतवाद कमी करणे हे तुमचे खूप मोठे यश आहे. पण आम्ही यावर भाषणं केली नाहीत. आम्ही तेथील पंचायत राजवर काम केलं, स्थानिक पातळीवर लोकांसोबत संवाद साधला. जर आज काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक माझ्याशेजारी उभे आहेत, म्हणजे काश्मीरमध्ये काहीही सुरळीत नाही. मात्र 2013मध्ये माझ्यासोबत सुरक्षा रक्षक नाही तर लोकं उभी होती. 2014 मध्ये काश्मीरमध्ये पुन्हा सुरक्षा रक्षकांची गरज भासू लागली. काश्मीरमध्ये अनेक पक्ष आहेत. पीडीपीनं नवीन लोकांना राजकारणात आणण्याचं काम केले. मात्र भाजपासोबत युती झाल्यानंतर या गोष्टी बंद झाल्या. आता तिच युवापिढी दहशतवाद्यांकडे वळत आहे. भाजपानं स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी काश्मीरचं नुकसान केले आहे.
10. भाजपाप्रमाणे काँग्रेसला वरिष्ठांचा विसर नाही
आम्ही आपल्या वरिष्ठ नेत्यांना अचानक बाजूला करत नाही. वरिष्ठ नेते व अन्य नेत्यांना जवळ आणत आहोत. 2012 मध्ये आमच्याकडून झालेल्या चुकांमुळे आम्ही लोकांपासून दुरावलो होतो. यामुळे 2014मध्ये लोकसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला होता.