Rahul Gandhi in West Bengal: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील 'भारत जोडो न्याय यात्रा' आज(दि.25) कूचबिहारमार्गे पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली. यावेळी राहुल गांधी यांचे अपेक्षेप्रमाणे स्वागत झाले नाही. काँग्रेसची यात्रा कूचबिहारमध्ये येताच तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यात्रेला पोस्टर दाखवले, ज्यावर 'बंगालमध्ये दीदी पुरेशी आहे', असे लिहिले होते.
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सकाळी 9 वाजता कूचबिहार येथून पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली आहे. सकाळी 11.15 वाजता राहुल गांधींची सभा पार पडली. आज म्हणजेच गुरुवारी यात्रेचा मुक्काम अलीपुरद्वार जिल्ह्यात असेल. दरम्यान, तृणमूल काँग्रेस इंडिया आघाडीचा भाग आहे, पण अलीकडेच ममता बॅनर्जी यांनी राज्यात स्वबळाचा नारा दिल्यामुळे इंडिया आघाडीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधींच्या यात्रेला राज्यात किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्वाचे असेल.
काय म्हणाले राहुल गांधी?राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगालमध्ये मित्रपक्ष तृणमूल काँग्रेसला आव्हान देण्यासाठी नाही, तर त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आल्याचा संदेश दिला आहे. बंगालमध्ये आल्यानंतर राहुल गांधींनी जनतेला संबोधित करत 'आम्ही तुमचे म्हणणे ऐकण्यासाठी आलो आहोत,' असे सांगितले. तसेच, देशात अन्याय होत आहे, म्हणून आम्ही आमच्या यात्रेत न्याय हा शब्द जोडला आहे. या अन्यायाविरुद्ध इंडिया आघाडी एकत्रितपणे लढणार असल्याचेही स्पष्ट केले.
जागावाटपावरुन वादआगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने इंडिया आघाडीसाठी पश्चिम बंगाल हा मजबूत बालेकिल्ला मानला जातोय. याचे कारण म्हणजे, तृणमूल काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेत आहे. मात्र, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये बंगालमधील जागावाटपाचा मुद्दा अजूनही अडकलेला आहे. त्यामुळे येणारे काही दिवस इंडिया आघाडीसाटी फार महत्वाचे असणार आहेत.